तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

तोंडात टाकताच विरघळेल अशी दुधीची बर्फी; मुलांनाही आवडेल ही सोपी रेसिपी

सणासुदीला किंवा अचानक पाहुणे आल्यावर झटपट गोड पदार्थ बनवायचा असेल तर दुधीची मऊशार बर्फी ट्राय करा. मावा किंवा पाक न करता साहित्य, कृती आणि खास टिप्ससह जाणून घ्या सोपी रेसिपी.

Mayuri Gawade

सण-समारंभ असो, पूजा असो किंवा घरी अचानक पाहुणे आले असतील, गोड पदार्थ काय बनवायचा हा प्रश्न नेहमीच पडतो. अशावेळी नेहमीचा शिरा किंवा खीर करण्याऐवजी दुधी भोपळ्याची मऊशार बर्फी ट्राय करू शकता. दुधीची भाजी न आवडणाऱ्या मुलांनाही हा गोड पदार्थ आवडू शकतो. विशेष म्हणजे यासाठी वेगळा पाक किंवा मावा तयार करण्याची गरज नाही.

साहित्य -

  • १ मध्यम आकाराचा दुधी भोपळा

  • २ ते ३ टेबलस्पून साजूक तूप

  • १ कप दूध

  • २ कप ओल्या नारळाचा किस

  • ½ कप मिल्क पावडर

  • ३ ते ४ टेबलस्पून दूध

  • ¾ कप साखर

  • १ टीस्पून वेलची पावडर

  • ३ ते ४ केशर काड्या

  • चिमूटभर हिरवा खाण्याचा रंग, ऐच्छिक

  • १ ते २ टेबलस्पून बारीक कापलेले बदाम-पिस्ते

कृती -

दुधीची साल काढून तो जाडसर किसून घ्या आणि त्यातील अतिरिक्त पाणी हलक्या हाताने पिळून काढा. कढईत तूप गरम करून दुधी ४ ते ५ मिनिटे परता. त्यात एक कप दूध घालून दुधी मऊ होईपर्यंत शिजवा.

आता नारळाचा किस घालून काही मिनिटे परता. मिल्क पावडर थोड्या दुधात गाठी न राहता मिसळून कढईत घाला. त्यानंतर साखर, वेलची, केशर आणि आवडीनुसार हिरवा रंग मिसळा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडा सोडू लागल्यावर तूप लावलेल्या ताटात पसरवा. वर बदाम-पिस्ते घालून थंड झाल्यावर वड्या कापा.

खास टिप्स -

दुधीतील अतिरिक्त पाणी नक्की काढा, अन्यथा बर्फी सैल होऊ शकते. मिल्क पावडर थेट न घालता आधी दुधात मिसळल्यास बर्फीला मऊ आणि एकसारखं टेक्स्चर मिळतं.

७२ पेक्षाही २०२६ चा दुष्काळ कठीण; सप्टेंबरमध्येच आटले जलस्रोत; यंदा पुनर्भरणच नाही

रत्नागिरीकरांना पावसाचा दिलासा! देवरुख परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी

महाराष्ट्र FDA करणार कर्नाटक मॉडेलचा अभ्यास; औषधांची खरेदी किंमत नमूद करण्यासाठी पडताळणी

कंत्राटदारांचे आज आंदोलन; राज्य सरकारकडे ८६ हजार कोटी थकले

Mumbai : हुश्श! उष्णतेच्या लाटेपासून दिलासा; कुलाबा, अंधेरी, भांडुपमध्ये सर्वाधिक खराब हवा