कढी हा अनेकांच्या आवडीचा पारंपरिक पदार्थ. मात्र, घरच्या घरी कढी बनवताना ती फाटणे, जास्त घट्ट होणे किंवा अपेक्षित चव न येणे, अशा समस्या अनेकदा जाणवतात. कढीची चव आणि योग्य पोत मिळवण्यासाठी काही छोट्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. बेसनाचे प्रमाण, दह्याचा आंबटपणा आणि कढी शिजवण्याची पद्धत यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. कढी बनवताना नेमक्या कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घेऊया.
१. ताज्या दह्याऐवजी आंबट दही वापरा
कढीची खरी चव तिच्या किंचित आंबटपणात असते. त्यामुळे ताजे किंवा गोडसर दही वापरल्यास कढीची चव फिकी लागू शकते. यासाठी एक-दोन दिवस जुने आंबट दही किंवा आंबट ताक वापरणे अधिक योग्य ठरते.
२. बेसन आणि दह्याचे प्रमाण योग्य ठेवा
कढीची घट्टपणा आणि पोत योग्य राहण्यासाठी बेसन आणि दह्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे. एक कप दही किंवा आंबट ताकासाठी साधारण २ ते ३ चमचे बेसन पुरेसे असते. बेसन जास्त झाल्यास कढी खूप घट्ट होते आणि थंड झाल्यावर आणखी दाट होऊ शकते.
३. बेसन व्यवस्थित फेटून घ्या
बेसन थेट पाण्यात मिसळल्यास त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे आधी दही चांगले फेटून घ्यावे. त्यात हळूहळू बेसन घालत सतत फेटावे. मिश्रण एकजीव आणि गुठळीरहित झाल्यानंतर त्यात थोडेथोडे पाणी घालून पुन्हा व्यवस्थित मिसळावे.
४. कढी मोठ्या आचेवर शिजवू नका
कढी बनवताना मोठ्या आचेचा वापर केल्यास ती फाटण्याची किंवा तळाला लागण्याची शक्यता असते. तसेच बेसनाचा कच्चट वासही राहू शकतो. त्यामुळे कढी नेहमी मंद आचेवर शिजवावी. अधूनमधून ढवळत राहिल्यास बेसन व्यवस्थित शिजते आणि कढीला छान चव येते.
५. सुरुवातीलाच मीठ घालू नका
कढी शिजवताना सुरुवातीलाच मीठ घालणे टाळावे. त्यामुळे दही फाटण्याची शक्यता वाढू शकते. कढीला चांगली उकळी आल्यानंतर किंवा ती जवळपास शिजल्यावर मीठ घातल्यास चवही योग्य राहते आणि कढी फाटण्याचा धोका कमी होतो.
६. कडक भजी बनवू नका
कढीतील भजी मऊ आणि हलकी असतील तर कढीची चव अधिक खुलते. भजीच्या पिठाला व्यवस्थित फेटले नाही तर भजी कडक आणि दाट होऊ शकतात. भजी फुलण्यासाठी काही जण बेकिंग सोडा वापरतात; मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास पोत बिघडू शकतो. त्याऐवजी पिठात थोडे दही घातल्यास भजी मऊ आणि हलकी होण्यास मदत होते.
कढी अधिक चविष्ट करण्यासाठी खास टिप
कढी शिजल्यानंतर लगेच भजी घालू नका. आधी कढी काही मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. त्यानंतर भजी घालून आणखी काही वेळ शिजू द्या. यामुळे भजी कढीचा स्वाद व्यवस्थित शोषून घेतात आणि कढी अधिक स्वादिष्ट लागते.
कढी बनवताना या छोट्या चुका टाळल्या, तर घरच्या घरीही मिळेल मऊ भजींसोबत छान घट्टसर आणि चविष्ट कढी.