नारळी पौर्णिमेला असा बनवा खमंग नारळी भात; सुटसुटीत होण्यासाठी 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

नारळी पौर्णिमेला असा बनवा खमंग नारळी भात; सुटसुटीत होण्यासाठी 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा

Narali Pournima 2026 : नारळी पौर्णिमेसाठी बनवा खमंग आणि मोकळा नारळी भात. जाणून घ्या नारळी भाताची सोपी रेसिपी, साहित्य आणि भात चिकट होऊ नये यासाठी महत्त्वाच्या ट्रिक्स.

Mayuri Gawade

नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन म्हटलं की घरात गोडधोड पदार्थांची लगबग सुरू होते. या खास दिवशी पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा नारळी भात अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. गुळाचा गोडवा, ओल्या खोबऱ्याची चव आणि तुपाचा सुगंध यामुळे हा भात अगदी खास लागतो.

नारळी भात बनवणं फार अवघड नाही. मात्र भात चिकट न होता मोकळा आणि लुसलुशीत होण्यासाठी काही छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया सोपी रेसिपी.

साहित्य

  • १ वाटी तांदूळ

  • १ वाटी ओलं खोबरं

  • १ वाटी गूळ

  • १ ते १.५ वाटी पाणी

  • १ चमचा साजूक तूप

  • दालचिनीचा छोटा तुकडा

  • २ वेलची

  • ३-४ लवंगा

  • आवडीनुसार ड्रायफ्रूट्स

  • केशराचं दूध (ऐच्छिक)

महत्त्वाची ट्रिक: या रेसिपीमध्ये सर्व साहित्य मोजताना एकाच वाटीचा वापर करा. तांदूळही चिकट होणारा न घेता मोकळा भात होईल असा तांदूळ निवडा.

कृती -

सुरुवातीला कढई किंवा कुकरमध्ये साजूक तूप गरम करा. त्यात दालचिनी, वेलची आणि लवंगा घालून छान परतून घ्या. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून हलके सोनेरी होईपर्यंत भाजा.

आता त्यात ओलं खोबरं घालून मध्यम आचेवर परता. खोबऱ्याला हलका सोनेरी रंग आला की धुतलेले तांदूळ त्यात घाला. तांदूळही साधारण दोन मिनिटं परतून घ्या. यामुळे भाताला छान सुगंध येतो आणि दाणे मोकळे राहण्यास मदत होते.

यानंतर साधारण १ ते १.५ वाटी कोमट पाणी घाला आणि भात शिजू द्या. भात अर्धवट शिजला की दुसरीकडे गूळ आणि दीड वाटी पाणी एकत्र करून गरम करा. इथे गुळाचा घट्ट पाक करण्याची गरज नाही; गूळ पूर्णपणे विरघळला की पुरेसं आहे.

गुळाचं पाणी गाळून शिजत असलेल्या भातात घाला. गाळल्यामुळे गुळातील अशुद्ध कण भातात जाणार नाहीत. यानंतर केशराचं दूध घालायचं असल्यास तेही मिसळा.

भात आणखी काही मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. झाकण ठेवून वाफेवर शिजवल्यास भात छान फुलतो. कुकरमध्ये करत असाल तर एक शिट्टी पुरेशी आहे.

तयार झालेला नारळी भात ताटात काढून वरून ड्रायफ्रूट्स घाला. गरमागरम नारळी भाताचा आस्वाद घ्या.

नारळी भात मोकळा होण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स

  • चिकट होणारा तांदूळ वापरू नका.

  • तांदूळ खोबऱ्यासोबत थोडा परतून घ्या.

  • गुळाचा पाक खूप घट्ट करू नका.

  • गुळाचं पाणी गाळूनच भातात घाला.

  • भात शिजताना वारंवार ढवळू नका.

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने यंदा नेहमीच्या गोड पदार्थांऐवजी हा पारंपरिक नारळी भात नक्की करून पाहा. सोपी रेसिपी आणि या छोट्या ट्रिक्स वापरल्या तर भात चविष्ट आणि मोकळा होईल.

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

महाराष्ट्राच्या प्रश्नांना द्वेषपूर्ण सरकारी उत्तर

Narali Purnima 2026 Wishes : नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! प्रियजनांसोबत शेअर करा मराठी Quotes आणि HD कार्ड्स

Raksha Bandhan 2026 Wishes : राखीच्या धाग्यात प्रेमाची वीण! भावा-बहिणीला पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश आणि आकर्षक कार्डस्

Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधनाचे ३ शुभ मुहूर्त! जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ आणि पूजा पद्धत