महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. यादिवशी समुद्राला नारळ अर्पण करून हा सण साजरा केला जातो. त्यामुळे नारळाला खास महत्त्व असतं. त्याचबरोबर गोडाधोडाचे पदार्थही घराघरात आवर्जून तयार होतात. विशेषतः नारळ वापरून बनणाऱ्या पारंपरिक चवींना यामध्ये मानाचं स्थान असतं.
पण, यंदा वेळ कमी आहे? घाई आहे? तरीही पारंपरिक चव टिकवायची आहे? मग, खास तुमच्यासाठी काही पारंपरिक आणि काही अगदी झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज घेऊन आलो आहोत...
१. नारळी भात
साहित्य:
३/४ कप तांदूळ
१.५ कप पाणी
३ चमचे साजूक तूप
२ ते ३ लवंगा
१/४ चमचे वेलची पूड
१ कप किसलेला गूळ
१ कप ताजा खवलेला नारळ
८ ते १० काजू
८ ते १० बेदाणे
कृती:
तांदूळ स्वच्छ धुऊन, चाळणीत निथळत ठेवावे. दरम्यान, पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करून त्यात लवंगा टाकाव्यात. त्यात निथळलेले तांदूळ घालून मध्यम आचेवर २–३ मिनिटं परतावं. दुसरीकडे गॅसवर पाणी गरम करावं आणि ते परतलेल्या तांदळावर ओतून झाकण ठेवून भात शिजवावा. भात शिजला की तो एका थाळीत काढून मोकळा करावा. तो गार होऊ द्यावा. नंतर खवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र मिक्स करावं. गार भातात हे मिश्रण अतिशय हलक्या हाताने मिसळावं. जाड लेअरच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात काजू आणि बेदाणे गुलाबी होईपर्यंत तळावेत. ते बाजूला काढून ठेवावेत. त्याच पातेल्यात उरलेलं तूप असतानाच भाताचं मिश्रण आणि वेलची पूड घालून हलक्या हाताने ढवळावं. घट्ट झाकण ठेवून १०-१५ मिनिटं मंद आचेवर वाफ द्यावी. शेवटी झाकण काढून २-३ मिनिटं वाफ काढावी. वरून काजू-बेदाण्यांची सजावट करून, गरमागरम तूपासोबत सर्व्ह करावा.
............................
ओल्या नारळाचे लाडू
साहित्य:
तूप - १ चमचा
ताजा खवलेला नारळ -३ कप
दूध - १ ¼ कप
दूध पावडर - ¼ कप
काजू - ¼ कप
साखर - १ कप
वेलची पूड - ¼ चमचा
लाडू घोळवण्यासाठी थोडं खोबरं (ऐच्छिक)
कृती:
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात काजू आणि दूध पावडर घालून बारीक पूड करून बाजूला ठेवा. आता एका जाड बुडाच्या कढईत १ चमचा तूप गरम करा आणि त्यात खोवलेलं नारळ घालून मंद आचेवर ८-१० मिनिटं परतून घ्या. नारळ हलका बदलला की त्यात दूध घालून एकसंध मिसळा. हे मिश्रण १०-१२ मिनिटं मंद आचेवर परतत राहा. मग त्यात काजू-दूधपावडरची पूड घाला आणि पुन्हा थोडं परतून घ्या. आता साखर घालून सतत ढवळत राहा. साखर वितळली की मिश्रण थोडं ओलसर होईल. हळूहळू ते घट्ट होत जाईल आणि एका गोळ्यासारखं एकत्र यायला लागेल. मिश्रण एकजीव आणि सैलसर वाटायला लागलं की गॅस बंद करा. हे मिश्रण थोडं गार होऊ द्या आणि कोमट असतानाच हातावर थोडं तूप लावून लाडू वळा. हवे असल्यास लाडू नारळाच्या कीसामध्ये घोळवा. याने त्यांचा लुक अजूनच आकर्षक दिसतो! हे लाडू दोन दिवस सहज फ्रेश राहतात, आणि फ्रिजमध्ये ठेवल्यास १५ दिवस टिकतात. नारळी पौर्णिमेसाठी झटपट गोडाचा परिपूर्ण पर्याय!
.................................................
ओल्या नारळाच्या वड्या
साहित्य:
२ कप खवलेला ओला नारळ
१ कप साखर
१/२ कप दूध
३ चमचे तूप
१/२ चमचे वेलचीपूड
वरून सजावटीसाठी ड्रायफ्रुट्स (ऐच्छिक)
कृती:
नारळ वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करा. यासाठी टोपात २ ग्लास पाणी घेऊन त्यात साखर टाका. साखरेचा पाक बनवताना त्यात थोडासा लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर पाक व्यवस्थित तयार झाल्यावर त्यात किसलेलं खोबर आणि वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्या. मिश्रण कोरडे होईपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवा. त्यानंतर ताटाला सगळीकडून तूप लावून घ्या. तयार केलेले खोबऱ्याचे मिश्रण ताटामध्ये सगळीकडे पसरवून ५ मिनिटं तसेच ठेवा. थंड मिश्रण झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने वड्या कापून घ्या. सजावटीसाठी ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून सर्व्ह करा.