चाळिशीनंतर अनेक महिलांच्या चालण्यात नकळत बदल होऊ लागतो. चालताना शरीर एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर हेलकावत असल्याचे दिसते. विशेषतः वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये ही समस्या अधिक आढळते. यालाच सर्वसाधारणपणे 'पेंग्विन वॉक' असे म्हटले जाते. सुरुवातीला हा बदल फारसा जाणवत नाही, मात्र कालांतराने चालण्याची ही पद्धत अधिक स्पष्ट दिसू लागते.
फिजिओथेरपिस्ट डॉ. अपूर्वा माठणकर यांनी त्यांच्या @dr.apurva_mathankar_pt या इन्स्टाग्राम पेजवर याविषयी महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांच्या मते, हिप्सच्या स्नायूंमध्ये आलेली कमजोरी हे यामागील प्रमुख कारण असू शकते.
पेंग्विन वॉक का सुरू होतो?
आपल्या हिप्सच्या आसपास काही महत्त्वाचे स्नायू असतात. हे स्नायू पेल्विसला योग्य स्थितीत आणि स्थिर ठेवण्याचे काम करतात. मात्र या स्नायूंची ताकद कमी झाली की ते सैल पडू लागतात. त्यामुळे शरीराचा तोल राखण्यात अडचण येते आणि चालताना शरीर एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर हेलकावत असल्याचे दिसते.
या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास पुढे चालण्यात अधिक बदल जाणवू शकतात. त्यामुळे वेळेवर स्नायूंना बळकट करणारे व्यायाम सुरू करणे गरजेचे आहे.
१. एका पायावर उभे राहण्याचा सराव
या व्यायामासाठी एका पायावर उभे राहा आणि दुसरा पाय वर उचला. सुरुवातीला संतुलन राखणे कठीण वाटत असेल तर भिंतीचा आधार घ्या. वृक्षासनाचाही पर्याय निवडू शकता. प्रत्येक पायावर किमान एक मिनिट उभे राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे हिप्स आणि पेल्विसच्या स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते.
२. बाजूला झोपून पाय उचलण्याचा व्यायाम
जमिनीवर एका कुशीवर झोपा. एक हात डोक्याखाली ठेवा आणि दुसऱ्या हाताचा तळवा जमिनीवर टेकवा. त्यानंतर वर असलेला पाय सरळ रेषेत वर उचला आणि काही सेकंद ही स्थिती कायम ठेवा. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही हाच व्यायाम करा. हा व्यायाम हिप्सच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
नियमित सराव का महत्त्वाचा?
हे दोन्ही व्यायाम नियमितपणे केल्यास हिप्सच्या स्नायूंमध्ये ताकद वाढण्यास मदत होऊ शकते. परिणामी चालण्यातला अस्थिरपणा कमी होऊन शरीराचा तोल अधिक चांगल्या प्रकारे राखता येतो. मात्र चालण्यात मोठा बदल जाणवत असल्यास किंवा समस्या वाढत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.