Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात... 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...

महिन्यातून दोनदा पाळी येतेय? हार्मोन्समधील बदल, तणाव, पीसीओएस किंवा इतर आरोग्याच्या समस्यांमुळे असं होऊ शकतं. डॉक्टरांकडून जाणून घ्या यामागची कारणं आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

Mayuri Gawade

महिलांच्या आरोग्यात मासिक पाळीला विशेष महत्त्व आहे. अनेक महिलांची पाळी दर महिन्याला ठरावीक दिवसांनी येते. मात्र, कधी कधी एकाच महिन्यात दोनदा रक्तस्राव झाल्याने चिंता वाढते. हा बदल हार्मोन्समुळे होतो की एखाद्या आरोग्याच्या समस्येमुळे, असा प्रश्न पडतो. प्रत्येक वेळी दोनदा पाळी येणं धोकादायक असतंच असं नाही. मात्र, वारंवार असं घडत असेल, तर त्यामागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. याबाबत अपोलो क्रेडलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीता वर्मा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

महिन्यातून दोनदा पाळी येणं सामान्य आहे का?

साधारणपणे मासिक पाळीचं चक्र २१ ते ३५ दिवसांचं असतं. काही महिलांना दर २१ किंवा २४ दिवसांनी पाळी येते. त्यामुळे ३१ दिवसांच्या महिन्यात दोनदा पाळी येऊ शकते. अशावेळी घाबरण्याची गरज नसते.

मात्र, पाळीचं चक्र वारंवार कमी होत असेल किंवा दोन पाळींमध्ये रक्तस्राव होत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायला हवं. पाळीच्या मधल्या काळात होणाऱ्या हलक्या रक्तस्रावाला 'स्पॉटिंग' म्हणतात.

पाळी लवकर येण्यामागे कोणती कारणं असतात?

अतिताण, अपुरी झोप, प्रवास, वजनात अचानक बदल आणि अतिव्यायाम यांचा हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाळी अपेक्षेपेक्षा लवकर येण्याची शक्यता असते.

काही महिलांना स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या काळात हलकं स्पॉटिंग होतं. गर्भनिरोधक गोळ्या, थायरॉईडमधील बदल किंवा इतर हार्मोनल औषधांमुळेही अनियमित रक्तस्राव होऊ शकतो.

या आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत

पीसीओएस, गर्भाशयातील फायब्रॉइड्स, पॉलिप्स किंवा अॅडेनोमायोसिसमुळे पाळीचं चक्र बिघडू शकतं. तसेच, वयाच्या ४० ते ४५ वर्षांच्या आसपास रजोनिवृत्तीपूर्व बदल सुरू झाल्यानेही पाळी अनियमित होऊ शकते.

गर्भधारणेच्या सुरुवातीला होणारा रक्तस्राव काही वेळा मासिक पाळी असल्यासारखा वाटू शकतो. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

कोणती लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जावं?

रक्तस्राव सात दिवसांपेक्षा जास्त सुरू राहणं, मोठ्या रक्ताच्या गुठळ्या पडणं किंवा वारंवार जास्त रक्तस्राव होणं ही दुर्लक्ष करण्यासारखी लक्षणं नाहीत. सलग तीन महिने महिन्यातून दोनदा रक्तस्राव होत असल्यास तपासणी करावी.

रक्तस्रावासोबत तीव्र पोटदुखी, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रक्तस्राव झाल्यासही विलंब करू नये.

महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

डॉ. वर्मा यांच्या मते, पाळीची तारीख, रक्तस्रावाचं प्रमाण आणि किती दिवस रक्तस्राव झाला, याची नोंद ठेवणं उपयुक्त ठरतं. पुढील दोन ते तीन पाळींच्या चक्रांचं निरीक्षण केल्याने बदल लक्षात येऊ शकतात. मात्र, पाळी वारंवार २१ दिवसांच्या आत येत असेल किंवा असामान्य रक्तस्राव होत असेल, तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(डिस्क्लेमर : ही माहिती तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि इंटरनेटवरील उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. 'नवशक्ति' याच्या अचूकतेची हमी देत नाही. कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Virar : जीवदानी देवीच्या दर्शनाला निघालेल्या मायलेकीवर काळाचा घाला! टँकरच्या धडकेत आईसह ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू