पावसाळा सुरू झाला की अनेकजण वीकेंडला लोणावळा, मावळ आणि लोहगडसारख्या निसर्गरम्य ठिकाणांची वाट धरतात. हिरवाईने नटलेले किल्ले, धबधबे आणि डोंगररांगा अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा या ठिकाणी जाण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने लोहगड, टायगर पॉइंट, भुशी धरणासह १० लोकप्रिय पर्यटनस्थळांवर विशेष सुरक्षा निर्बंध लागू केले आहेत.
कोणत्या पर्यटनस्थळांवर लागू आहेत निर्बंध?
मावळ आणि लोणावळा परिसरातील लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी आणि पवना धरण परिसरात हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे आदेश ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत.
काय करता येणार नाही?
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार,
धबधबे किंवा खोल पाण्यात उतरण्यास मनाई
कडा किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यास बंदी
जीव धोक्यात घालणारे स्टंट किंवा साहसी प्रकार करण्यास मनाई
मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास बंदी
पर्यटनस्थळे आणि जलाशयांमध्ये कचरा टाकण्यास मनाई
वाहन पाण्यात उतरवणे किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्यास बंदी
या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 मधील कलम १६३ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
पर्यटकांसाठी महत्त्वाच्या सूचना
पावसाळ्यात ट्रेक किंवा भटकंतीला जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच चांगली पकड असलेले ट्रेकिंग शूज, रेनकोट किंवा रेन गिअर सोबत ठेवावे, पुरेसे पाणी बाळगावे आणि शक्यतो एकट्याने ट्रेक करू नये, असेही सांगण्यात आले आहे.
याशिवाय सकाळी लवकर ट्रेक सुरू करणे, आपल्या प्रवासाची माहिती कुटुंबीय किंवा मित्रांना देणे आणि गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाचे आवाहन
पर्यटकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे पालन केल्यास पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा सुरक्षितपणे आनंद घेता येईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.