आजकाल अनेक प्रवासी रेल्वेचं अनारक्षित (UTS) तिकीट RailOne ॲपवरून बुक करतात. अनेकदा तिकीट काढल्यानंतर ते WhatsApp वर नातेवाईक किंवा मित्रांना पाठवलं जातं, स्क्रीनशॉट किंवा PDF स्वरूपात सेव्ह केलं जातं. मात्र, अशी सवय महागात पडू शकते. कारण रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, तपासणीदरम्यान ज्या मोबाईलवरून तिकीट बुक करण्यात आलं आहे, त्याच मोबाईलमध्ये मूळ तिकीट दाखवणं बंधनकारक आहे. अन्यथा, वैध तिकीट असूनही प्रवाशाला विनातिकीट मानलं जाऊ शकतं आणि नियमानुसार दंडही भरावा लागू शकतो.
WhatsApp वरील तिकीट ग्राह्य धरलं जाणार नाही
भारतीय रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, RailOne ॲपवरून बुक केलेल्या डिजिटल अनारक्षित तिकिटाची तपासणी करताना मूळ ॲपमधील तिकीटच वैध मानलं जाईल. WhatsApp वर शेअर केलेलं तिकीट, स्क्रीनशॉट, फोटो किंवा PDF प्रत तपासणीवेळी ग्राह्य धरली जाणार नाही.
'या' घटनेनंतर रेल्वेने केला नियम स्पष्ट
रेल्वेने हा खुलासा कोरबा–विशाखापट्टणम लिंक एक्स्प्रेसमधील एका घटनेनंतर केला. एका प्रवाशाने तपासणीदरम्यान WhatsApp वर आलेला तिकिटाचा स्क्रीनशॉट दाखवला होता. मात्र, तपासणीत संबंधित तिकीट ट्रेन सुटल्यानंतर बुक केल्याचं आणि ते प्रवाशाच्या नोंदणीकृत मोबाईलमध्ये उपलब्ध नसल्याचं आढळलं. त्यानंतर संबंधित प्रवाशावर दंडाची कारवाई करण्यात आली.
कोणता नियम पाळणं आवश्यक?
रेल्वेच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, RailOne ॲपवरून बुक केलेलं अनारक्षित तिकीट ज्या नोंदणीकृत मोबाईलवरून बुक केलं आहे, त्याच मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे. याशिवाय, प्रवाशाने फोटो असलेलं वैध ओळखपत्रही सोबत ठेवणं गरजेचं आहे. तिकीट तपासनीस आवश्यकतेनुसार ओळखपत्राचीही पडताळणी करू शकतात.
ज्या प्रवाशाला तपासणीवेळी त्याच्या नोंदणीकृत मोबाईलमध्ये मूळ तिकीट दाखवता येणार नाही किंवा ओळख सिद्ध करता येणार नाही, त्याला विनातिकीट प्रवासी मानलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत रेल्वेच्या नियमानुसार दंड आकारला जाऊ शकतो.
प्रवाशांनी लक्षात ठेवा...
रेल्वेने प्रवाशांना प्रवासादरम्यान तिकीट बुक केलेला मोबाईल सोबत ठेवण्याचा, तो चार्ज असल्याची खात्री करण्याचा आणि RailOne ॲपमध्ये तिकीट उपलब्ध आहे का, हे आधीच तपासून पाहा. हे नियम RailOne ॲपवरून बुक केलेल्या डिजिटल अनारक्षित (UTS) तिकिटांनाच लागू असून, आरक्षित तिकिटांच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.