Skin Care : चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा उजळते का? करीना-करिश्माच्या सवयींबाबत तज्ज्ञ सांगितात... 
लाईफस्टाईल

Skin Care : चेहऱ्यावर तूप लावल्याने त्वचा उजळते का? करीना-करिश्माच्या सवयींबाबत तज्ज्ञ सांगतात...

तूप भातात घालून खाणे किंवा पोळीवर लावून खाणे हा त्यांच्या घरातील नेहमीचा भाग आहे. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

बॉलिवूडमधील कपूर बहिणींच्या सौंदर्याची आणि फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते. करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर या दोघीही आपल्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी पारंपरिक घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. करिश्मा कपूरने यापूर्वी चेहऱ्यावर तूप लावत असल्याचा खुलासा केला होता. आता करीना कपूरनेही झोपण्यापूर्वी पायांना तूप लावत असल्याचे सांगितले आहे. यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते, असा तिचा अनुभव आहे. मात्र, पायांना तूप लावल्याने झोप सुधारते का? तसेच त्वचेवर तूप लावणे किंवा आहारात त्याचा समावेश केल्याने त्वचा उजळते का? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

झोपण्यापूर्वी पायांना तूप लावते करीना कपूर

करीना कपूर खान आणि तिचा पती सैफ अली खान यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्यांच्या ताजेतवाने दिसण्यामागचे रहस्य विचारले. त्यावर सैफ अली खानने त्यांच्या घरात सध्या भरपूर तूप वापरले जात असल्याचे सांगितले.

करीनानेही या गोष्टीला दुजोरा दिला. त्यांच्या घरात मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तूप खात असल्याचे तिने सांगितले. यानंतर सैफने करीना केवळ तूप खात नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी पायांनाही तूप लावते, असा खुलासा केला.

यामागचे कारण सांगताना करीना म्हणाली की, पायांना तूप लावल्याने तिला चांगली झोप लागते. तिच्या या वक्तव्यामुळे पायांची मालिश करण्याच्या पारंपरिक पद्धतीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आयुर्वेदात पायांच्या मालिशला 'पादाभ्यंग' असे म्हटले जाते. झोपण्यापूर्वी पायांची मालिश केल्याने काही व्यक्तींना आराम मिळू शकतो. मात्र, विशेषतः तूप लावल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते, याबाबत पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

करिश्मा कपूरचाही चेहऱ्यावर तूप लावण्यावर विश्वास

करीना कपूरप्रमाणेच तिची बहीण करिश्मा कपूरही सौंदर्याची काळजी घेण्यासाठी पारंपरिक उपायांचा वापर करते. 'द फ्री प्रेस जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत करिश्माने चेहऱ्यावर तूप लावणे, तूप खाणे आणि साय वापरणे यांसारख्या सवयींबद्दल सांगितले होते.

लहानपणापासून घरातील ज्येष्ठांकडून हे उपाय पाहत आल्याने त्यांचा आपल्या दिनक्रमावर प्रभाव असल्याचे तिने स्पष्ट केले. तिच्या आजीही त्वचेची काळजी घेण्यासाठी तूप आणि साय यांसारख्या घरगुती पदार्थांचा वापर करत असत.

करिश्माच्या मते, तूप भातात घालून खाणे किंवा पोळीवर लावून खाणे हा त्यांच्या घरातील नेहमीचा भाग आहे. मात्र, तूप खाल्ल्याने किंवा चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळते, या दाव्याला वैज्ञानिक आधार किती आहे, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे.

त्वचेवर तूप लावण्याचे फायदे काय?

त्वचारोगविषयक तज्ज्ञ डॉ. स्मृती नथानी यांच्या मते, तुपामध्ये असलेल्या स्निग्ध घटकांमुळे त्वचेला ओलावा मिळण्यास मदत होऊ शकते. त्वचेवर तुपाचा थर तयार झाल्याने ओलावा टिकून राहण्यासही मदत होऊ शकते.

कोरडी त्वचा, फुटलेले ओठ तसेच कोपर, गुडघे आणि टाचांवरील खरखरीत त्वचेसाठी तुपाचा मर्यादित वापर काही प्रमाणात उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम वाटू शकते.

मात्र, तूप हा प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य उपाय नाही. विशेषतः तेलकट त्वचा किंवा मुरुमे येण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींनी चेहऱ्यावर तूप लावताना काळजी घेणे आवश्यक आहे.

तूप लावण्याचे तोटेही जाणून घ्या

तूप लावल्याने त्वचेवरील मुरुमे, काळे डाग किंवा वाढत्या वयामुळे दिसणाऱ्या खुणा दूर होतात, असे मानण्यास पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. उलट, काही व्यक्तींमध्ये तुपामुळे त्वचा अधिक तेलकट होऊ शकते किंवा मुरुमांचा त्रास वाढू शकतो.

त्यामुळे चेहऱ्यावर वारंवार मुरुमे येत असतील किंवा त्वचेची छिद्रे बंद होण्याची समस्या असेल, तर तूप वापरण्याऐवजी त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायझर निवडणे अधिक उपयुक्त ठरू शकते. त्वचेचा त्रास कायम असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

तूप खाल्ल्याने त्वचा उजळते का?

करिश्मा कपूरचा तूप खाण्यावरही विश्वास आहे. मात्र, आहारात तुपाचा समावेश केल्याने त्वचा आपोआप उजळते किंवा तिच्यात मोठा बदल होतो, असे म्हणता येत नाही.

तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहारात स्निग्ध पदार्थांची भूमिका महत्त्वाची असते. तूपही योग्य प्रमाणात संतुलित आहाराचा भाग असू शकते. मात्र, त्याचे अतिसेवन करणे योग्य नाही. तुपात संतृप्त स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे सेवन वैयक्तिक आरोग्यस्थिती आणि एकूण आहारानुसार मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे.

त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप, संतुलित आहार, शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण, तणावाचे व्यवस्थापन आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

तूप हा पारंपरिक घरगुती उपाय असला, तरी त्याला त्वचेच्या सर्व समस्यांवरील रामबाण उपाय समजू नये. कोरड्या त्वचेसाठी त्याचा मर्यादित वापर काहींना फायदेशीर ठरू शकतो, मात्र तेलकट किंवा मुरुमे येणाऱ्या त्वचेसाठी तो योग्य असेलच असे नाही.

त्याचप्रमाणे पायांना तूप लावल्याने काही व्यक्तींना आराम मिळू शकतो, पण त्यामुळे झोप सुधारते, हे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे पारंपरिक उपायांचा वापर करताना स्वतःच्या त्वचेचा प्रकार आणि आरोग्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

(Disclaimer: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. ती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. त्वचेचा त्रास असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीपूर्वी HC मोठा निर्णय! रस्त्यांवर, गल्लीबोळात फटाके फोडण्यास ‘बंदी’चा आदेश आता वर्षभरासाठी; सर्व उत्सवांत नियम लागू

Mumbai : अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; 'भारत सोडा' नोटिसला आव्हान

महाराष्ट्रात ऊस गाळप हंगाम सुरू; ३० साखर कारखान्यांना प्रत्यक्ष गाळप परवाने

इथेनॉलचा पुरवठा ९८७ कोटी लिटरवर; अन्नधान्य आधारित घटकांचे नेतृत्व : AIDA

मुक्ता-मीरा यांची नवी भरारी! ‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाचा २३ ऑक्टोबरला शुभारंभ