लाईफस्टाईल

रात्रीच्या जेवणासाठी झटपट आणि चविष्ट भाजी हवी? बनवा शेंगदाण्याच्या सारणाची भरली शिमला मिरची

रात्रीच्या जेवणात रोजची भाजी खाऊन कंटाळला असाल तर बनवा शेंगदाणे, खोबरे आणि मसाल्याच्या सारणाची झणझणीत गावरान स्टाईल भरली शिमला मिरची.

Mayuri Gawade

रोज रात्रीच्या जेवणात नेमकं काय बनवायचं, हा प्रश्न अनेकदा पडतो. नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत, घरगुती आणि वेगळं खावंसं वाटत असेल, तर भरलेली शिमला मिरची एकदा नक्की करून पाहा. शेंगदाणे, सुके खोबरे, कांदा आणि गोडा मसाल्याचं खमंग सारण भरून केलेली ही गावरान पद्धतीची भाजी भाकरी किंवा पोळीसोबत भन्नाट लागते.

विशेष म्हणजे ही भाजी करण्यासाठी फार काही वेगळं साहित्य लागत नाही. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये ही रेसिपी सहज तयार होते. शिमला मिरचीमध्ये भरलेलं मसालेदार सारण आणि बाहेरून हलकं खरपूस झालेली मिरची यामुळे साध्या जेवणाची चवही खुलून येते. चला तर मग, रात्रीच्या जेवणासाठी ही झणझणीत रेसिपी कशी करायची ते पाहूया.

साहित्य

  • ५ ते ६ मध्यम आकाराच्या शिमला मिरच्या

  • १ मोठा कांदा

  • अर्धा कप भाजलेले शेंगदाणे

  • २ टेबलस्पून सुके खोबरे

  • १ टेबलस्पून बेसन

  • १ ते २ हिरव्या मिरच्या

  • १ टीस्पून लाल तिखट

  • अर्धा टीस्पून हळद

  • १ टीस्पून गोडा मसाला

  • १ टीस्पून धणेपूड

  • अर्धा टीस्पून जिरेपूड

  • अर्धा टीस्पून मोहरी

  • अर्धा टीस्पून जिरे

  • चवीनुसार मीठ

  • २ ते ३ टेबलस्पून तेल

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम शिमला मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या करून घ्या. त्यांचा देठ कापून आतील बिया काढा. मिरची पूर्णपणे कापू नका, म्हणजे त्यामध्ये सारण भरता येईल.

आता भाजलेले शेंगदाणे आणि सुके खोबरे जाडसर कुटून घ्या. कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परता. कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात बेसन घालून मंद आचेवर भाजून घ्या.

यानंतर कुटलेले शेंगदाणे-खोबरे, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि मीठ घाला. हे मिश्रण दोन-तीन मिनिटे व्यवस्थित परतून घ्या. सारण कोरडेच राहू द्या.

तयार सारण थोडे थंड झाल्यावर प्रत्येक शिमला मिरचीमध्ये भरून घ्या. आता कढईत तेल गरम करून मोहरी आणि जिरे तडतडू द्या. त्यात भरलेल्या शिमला मिरच्या सावधपणे ठेवा.

कढईवर झाकण ठेवून मिरच्या मंद आचेवर शिजू द्या. मध्येच मिरच्या हलक्या हाताने फिरवत राहा, जेणेकरून त्या सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजल्या जातील. मिरची मऊ होऊन बाहेरून थोडी खरपूस झाली की गॅस बंद करा.

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम भरली शिमला मिरची भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत सर्व्ह करा.

पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजाराने स्थायी समिती तापली; अपुरे मनुष्यबळ, फॉगिंग मशीनमुळे सदस्य संतप्त

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

­शिक्षणानंतरही नोकरीची शाश्वती नाही; पुण्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली खंत

करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? जिम VIDEO व्हायरल होताच चर्चांना उधाण; अखेर टीमने सांगितलं सत्य