थंडीच्या दिवसांत चहात तुळशीची पाने टाकताय? आधी हे वाचा! प्रत्येक तुळशीची चव नसते सारखी  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

थंडीच्या दिवसांत चहात तुळशीची पाने टाकताय? आधी हे वाचा! प्रत्येक तुळशीची चव नसते सारखी

थंडीच्या दिवसांत चहामध्ये तुळशीची पाने वापरताय? रामा आणि श्यामा तुळशीच्या चवीतील फरक, योग्य निवड आणि तुळशीचा चहा बनवण्याची सोपी कृती जाणून घ्या.

Mayuri Gawade

हिवाळ्यात सकाळी किंवा संध्याकाळी गरमागरम चहाचा कप मिळाला की दिवसाचा थकवा काहीसा हलका झाल्यासारखा वाटतो. नेहमीच्या चहाला वेगळी चव मिळावी म्हणून अनेकजण त्यात आलं, वेलची, लवंग किंवा दालचिनी घालतात. तर काहींच्या घरात चहा बनवताना अंगणातील तुळशीची पानेही वापरली जातात. तुळशीच्या पानांमुळे चहाला एक वेगळाच सुगंध येतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, तुळशीचेही वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येक प्रकाराची चव, सुगंध वेगळा असतो. त्यामुळे चहात कोणतीही तुळशीची पाने घालण्याऐवजी तिचा प्रकार जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रामा तुळस आणि श्यामा तुळस यांपैकी कोणती तुळस चहासाठी वापरावी, जाणून घेऊया.

तुळशीचे प्रकार वेगवेगळे, मग चहाची चवही वेगळी!

घरांमध्ये प्रामुख्याने रामा तुळस आणि श्यामा तुळस हे दोन प्रकार पाहायला मिळतात. दोन्ही प्रकारच्या तुळशीचा वापर चहा बनवण्यासाठी करता येतो. मात्र, त्यांच्या पानांचा रंग, सुगंध आणि चव यांमध्ये फरक असतो.

१. रामा तुळस

रामा तुळशीची पाने हिरव्या रंगाची असतात. या तुळशीचा सुगंध सौम्य आणि चव तुलनेने कमी तीव्र असते. त्यामुळे चहामध्ये रामा तुळशीची पाने घातल्यास चहाचा मूळ स्वाद कायम राहतो आणि त्याला हलका सुगंध मिळतो. ज्यांना चहामध्ये तुळशीची चव हवी आहे, पण ती फार उग्र नको आहे, त्यांच्यासाठी रामा तुळस चांगला पर्याय ठरू शकते.

२. श्यामा तुळस

श्यामा तुळशीला कृष्णा तुळस असेही म्हणतात. या तुळशीची पाने हिरवट-जांभळ्या रंगाची असतात. रामा तुळशीच्या तुलनेत तिचा सुगंध अधिक तीव्र असतो. चहामध्ये श्यामा तुळशीची पाने वापरल्यास त्याला ठसकेबाज सुगंध आणि काहीशी तिखटसर चव मिळते. ज्यांना मसालेदार आणि ठळक स्वादाचा चहा आवडतो, ते या तुळशीची पाने वापरू शकतात.

चहामध्ये तुळशीची पाने कशी वापरावीत?

तुळशीचा चहा बनवण्यासाठी वेगळी तयारी करण्याची गरज नाही. नेहमीचा चहा बनवतानाच त्यात तुळशीची पाने घालता येतात.

साहित्य :

  • १ कप पाणी

  • ४ ते ५ स्वच्छ तुळशीची पाने

  • आल्याचा छोटा तुकडा

  • १ लवंग

  • अर्धा चमचा चहापत्ती

  • आवश्यकतेनुसार दूध आणि साखर

कृती :

सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तुळशीची पाने, आल्याचा ठेचलेला तुकडा आणि लवंग घाला. हे मिश्रण ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. त्यानंतर चहापत्ती, दूध आणि साखर घालून नेहमीप्रमाणे चहा तयार करा. तयार चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा.

तुळशीचा चहा बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुळशीची पाने वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

  • चहामध्ये एकदम जास्त पाने घालू नका. सुरुवातीला ४ ते ५ पाने पुरेशी आहेत.

  • तुळशीचा सुगंध आणि चव लक्षात घेऊन पानांचे प्रमाण ठरवा.

  • रामा आणि श्यामा या दोन्ही तुळशींचा वापर चहामध्ये करता येतो.

हिवाळ्यात रोजच्या चहामध्ये थोडासा बदल करायचा असेल, तर तुळशीच्या पानांचा हा पर्याय नक्की वापरून पाहा. सौम्य सुगंधासाठी रामा तुळस आणि ठसकेबाज चवीसाठी श्यामा तुळस निवडू शकता. अर्थात, तुळशीचा चहा हा स्वादासाठीचा पर्याय असून सर्दी-खोकला किंवा इतर आजारांवरील उपचारांचा पर्याय नाही.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी