'FIR झाली तरी सत्य उघड करणारच'; सरकारी शाळेतील मुदतबाह्य अन्नावर अभिजीत दिपकेंचा इशारा, Video (X व्हिडीओतून घेतलेला स्क्रीनशॉट)
महाराष्ट्र

'FIR झाली तरी सत्य उघड करणारच'; सरकारी शाळेतील मुदतबाह्य अन्नावर अभिजीत दिपकेंचा इशारा, Video

सीजेपीने सुरू केलेल्या 'स्कूल ठीक करो' अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधा, पायाभूत व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे दिपके यांनी सांगितले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी (दि. २९) सरकारी शाळेच्या स्वयंपाकघरातील मुदतबाह्य अन्नपदार्थांचा मुद्दा उपस्थित केला. 'स्कूल ठीक करो' अभियानांतर्गत शाळेची पाहणी करताना मुदतबाह्य मसाल्याचे पाकीट आढळल्याचा दावा त्यांनी केला. हा प्रकार उघड केल्यामुळे एफआयआर दाखल झाली तरी सत्य समोर आणणे थांबवणार नाही, असा इशारा दिपके यांनी दिला. त्यांच्या या पाहणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘सत्ताधारी त्यांच्या मुलांना हेच अन्न खायला देणार का?’

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिपके शाळेच्या स्वयंपाकघराची पाहणी करताना दिसतात. यावेळी त्यांनी तेथे आढळलेल्या अन्नपदार्थांची तपासणी केली. कथित मुदतबाह्य अन्नपदार्थ दाखवत त्यांनी सत्तेत असलेल्या व्यक्तींना सवाल केला.

आपल्या पोस्टमध्ये दिपके यांनी, "सत्तेत बसलेले लोक हेच अन्न आपल्या मुलांना खायला देतील का?" असा सवाल केला. तसेच, "हा प्रकार उघड केल्यामुळे आमच्यावर एफआयआर दाखल होत असेल, तर करा. आम्ही सत्य उघड करणे थांबवणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

मुदतबाह्य मसाल्याचे पाकीट

व्हिडीओमध्ये दिपके एका मसाल्याच्या पाकिटाची तपासणी करताना दिसतात. त्यांच्या दाव्यानुसार, हे पाकीट ऑगस्ट २०२५ मध्ये पॅक करण्यात आले होते आणि फेब्रुवारी २०२६ पूर्वी त्याचा वापर करणे अपेक्षित होते. त्यामुळे संबंधित मसाला मुदतबाह्य असल्याचे त्यांनी म्हटले.

"ग्रामीण भारतातील मुलांना मुदतबाह्य अन्न दिले जात आहे," असा आरोपही दिपके यांनी केला. मात्र, संबंधित अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वितरित करण्यात आला होता का, तसेच या प्रकरणी संबंधित शाळा किंवा प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आले आहे, याबाबतची स्वतंत्र माहिती समोर आलेली नाही. तसेच, दिपके यांनी शेअर केलेला व्हिडीओ नेमका कोणत्या शाळेतील आहे, हेही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या आरोपांशी संबंधित शाळा किंवा ठिकाणाची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नाही.

'स्कूल ठीक करो' अभियानातून पाहणी

सीजेपीने सुरू केलेल्या 'स्कूल ठीक करो' अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. सरकारी शाळांमधील मूलभूत सुविधा, पायाभूत व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे दिपके यांनी सांगितले आहे.

या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील एका शाळेला दिलेल्या भेटीत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक किलोमीटर प्रवास करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. संबंधित गावात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना दूरवर जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. योग्य वाहतूक व्यवस्था नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

स्वच्छतागृहांपासून वाहतुकीपर्यंत सुविधांचा आढावा

'स्कूल ठीक करो' अभियान केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचता येते का, शाळेत मूलभूत सुविधा आहेत का, स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे का आणि पायाभूत सुविधा पुरेशा आहेत का, याचाही आढावा घेण्यात येणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे.

अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा दावा या अभियानातून करण्यात येत आहे. काही ठिकाणी शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधांची स्थिती खराब असल्याचे, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहांची सुविधाही अपुरी असल्याचे अभियानाच्या माध्यमातून मांडण्यात येत आहे.

देशभरातील शाळांची माहिती गोळा करणार

अभियानाच्या माध्यमातून पालक आणि सरकारी अधिकाऱ्यांनी शाळांमधील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी तपासणी सूची तयार करावी, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील शाळांमधून माहिती गोळा करून तिचे संकलन करण्याची सीजेपीची योजना आहे. या माध्यमातून शाळांमधील सुविधांची वास्तविक स्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

या पाहणीदरम्यान करण्यात आलेले आरोप आणि गोळा करण्यात येणारी माहिती अधिकृत तपासणीतून कितपत सिद्ध होते, तसेच संबंधित प्रशासनाकडून त्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

IDBI Bank Privatisation: मोठी बातमी! IDBI बँकेतील हिस्सा फेअरफॅक्सला विकणार; तब्बल ५२,८७८ कोटी रुपयांची डील

विलेपार्ले स्थानक परिसर होणार रुंद; सांताक्रूझमधील अतिक्रमणे हटवणार, अश्विनी भिडेंचे 'पादचारी प्रथम'अभियानांतर्गत निर्देश

Mumbai : तीन डोमिनोज आऊटलेट्ससह १७ खाद्य परवाने निलंबित

Mumbai : स्क्रीन टाईम, जंक फूडमुळे बाल लठ्ठपणा वाढतोय; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० प्रकरणे नोंदवली