महाराष्ट्र

अपघात की घातपात? हाच तपासाचा उद्देश; अजित पवारांच्या दुर्घटनेबाबत CIDची माहिती; घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून या अपघाताचा तपास आता कुठपर्यंत आला आहे? तपासात सीआयडीच्या हाताला काय लागले? तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे? याबाबतची सविस्तर माहिती सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

Swapnil S

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून या अपघाताचा तपास आता कुठपर्यंत आला आहे? तपासात सीआयडीच्या हाताला काय लागले? तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे? याबाबतची सविस्तर माहिती सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘अजित पवारांचा अपघात नव्हे घातपात असल्याचे निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करेल. यासंदर्भात पुणे आणि मुंबई येथील पोलीस अधिकारी तपास करत आहेत’, असे यावेळी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद म्हणाले की, ‘अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. आता या तपासाचा उद्देश काय? तर अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात आहे का? हा या तपासाचा एक उद्देश आहे, म्हणजे अजित पवारांचा घातपात की अपघात? याचा तपास करण्यात येत आहे. किंवा इतर कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का? हा या तपासाचा स्कोप आहे. यामध्ये तीन गोष्टी आहेत. त्यात गुन्हेगारी कट कारस्थान, निष्काळजीपणा आणि कोणतेही गुन्हेगारी कृत्य आहे का? या अँगलने सीआयडीचा तपास सुरू आहे’, असे सुनील रामानंद यांनी सांगितले.

गुन्हेगारी कृत्य असल्यास न्यायालयात अभियोग

“सदर घटनेचा तपास महाराष्ट्र सरकारने सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. थोडक्यात या तपासात गुन्हेगारी कट वगेरे, तसेच घातक निष्काळजीपणा आणि कोणतेही गुन्हेगारी कृत्य असे काही निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयात अभियोग चालवेल’, असेही सुनील रामानंद यांनी सांगितले आहे.

‘सीआयडी’ने दिली तपासाबाबतची माहिती

अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. मात्र, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी काही पत्रकार परिषद घेऊन अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अजित पवारांचा अपघात की घातपात? याबाबत विरोधकही अनेक प्रश्न विचारत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सीआयडी’तर्फे पत्रकार परिषद घेऊन विमान अपघाताच्या तपासाचा उद्देश व तपासाबाबतची माहिती देण्यात आली.

"बारामती येथील विमान दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानातील अजित पवार व अन्य व्यक्तींच्या आकस्मिक मृत्यूचा तपास पोलिस स्टेशन बारामती येथे कलम १९४ ‘बीएनएसएस’ अंतर्गत नोंद करण्यात आला होता. त्यानंतर हा तपास पोलिस महासंचालकांनी सीआयडीकडे वर्ग केला आहे. सध्या हा तपास सीआयडी करत आहे. सदर तपास पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोठ्या प्रमाणात बारामतीकर पोलिस ठाण्याबाहेर दाखल

बारामती पोलीस ठाण्यात सकाळी युगेंद्र पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार यांच्यासह अनेक वकील देखील दाखल झाले होते. ‘अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा सीबीआय तपास करत आहे.आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले आहे. ते तपास करत आहेत. डीजीसीए आणि विमान कंपनीवरती गुन्हा दाखल करावा, ही मागणी रोहित पवारांनी केली. मोठ्या प्रमाणावर पवारांचे समर्थक बारामती पोलीस स्टेशनसमोर दाखल झाले. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

पोलिसांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली तरी ते एफआयआर दाखल करून घेत नाहीत, अशी माहिती वकील सूत्रांनी दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, ‘बारामती आणि महाराष्ट्रातील जनतेला या प्रकरणाची सत्यता जाणून घ्यायची आहे. माहिती देण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याने लोकांच्या मनात शंका बळावत आहे.

‘ब्लॅक बॉक्स’ जळाला वगैरे गोष्टी संशयास्पद

तर रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या अनेक समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की, अनेक शक्ती हा गुन्हा दाखल करू देत नाहीत, म्हणून आम्ही बारामतीकर मोठ्या संख्येने गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी येथे जमलो आहोत. आम्हाला हा घातपात वाटतोय. ब्लॅक बॉक्स जळाला वगैरे गोष्टी संशयास्पद वाटत आहेत, सर्वांनीच जनतेच्या प्रश्नांची उत्तरे आणि जो अपघाताचा रिपोर्ट आहे, तो दिला पाहिजे. पण आम्हाला हा घातपात असल्याचे वाटत आहे, असेही काही समर्थकांनी म्हटले आहे.

विमान खराब होते तर दादांना का दिले?

व्हीएसआरकडे लिअरजेटची ७ विमाने होती, त्यापैकी दोन विमानांचा अपघात झाला आहे. ‘व्हीएसआर’ नियम पाळत नव्हती, असा ठपका ‘डीजीसीए’नेच ठेवला आहे. ‘व्हीएसआर’ची विमाने खराब होती तर दादांना ते का दिले'? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच ‘व्हीएसआर’ कंपनी, त्यांचे मालक यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ दाखल करा', अशी मागणी देखील आमदार रोहित पवारांनी केली आहे.

तपास होण्याची वाट पाहत होतो

रोहित पवार पुढे म्हणाले की,‘मुंबईत एफआयआर दाखल करू शकला असता, पण केला नाही. कुठल्याही नागरिकाला ‘एफआयआर’ दाखल करण्याचा अधिकार आहे. ललिताकुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या खटल्यात ‘एफआयआर’ कुणालाही दाखल करता येतो, असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. ३०-३१ जानेवारीला एफआयआर दाखल करु शकलो असतो पण तपास होण्याची वाट पाहत होतो. २४ फेब्रुवारीला ‘व्हीएसआर’चा रिपोर्ट आल्यानंतर २५ तारखेला तक्रार दिली', असे रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको