"माझी प्रिय बहीण मी आज गमावली"; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने राज्यात शोककळा, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण 
महाराष्ट्र

"माझी प्रिय बहीण मी आज गमावली"; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने राज्यात शोककळा, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली अर्पण

आशा भोसले यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत भारतीय संगीताला दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाची आठवण केली. अनेकांनी त्यांना "प्रेरणा देणारी गायिका" असे संबोधले.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (दि. १२) मुंबईत वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी त्यांच्या निधनाचे कारण 'मल्टिपल ऑर्गन फेल्युअर' असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाची माहिती मुलगा आनंद भोसले यांनी दिली. या बातमीने देशभरातील चाहत्यांसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रातून शोकभावना व्यक्त

आशा भोसले यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत भारतीय संगीताला दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाची आठवण केली. अनेकांनी त्यांना "प्रेरणा देणारी गायिका" असे संबोधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदरांजली अर्पण

देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या संगीतावरील निष्ठेचा उल्लेख केला. "त्या जगातील महान गायिकांपैकी एक होत्या," असे सांगत त्यांनी त्यांच्या ९०व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या तीन तासांच्या मैफलीची आठवण करून दिली. त्यांच्या समर्पणाचे ते उत्तम उदाहरण असल्याचे फडणवीस म्हणाले.

चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात भिजवणारा आवाज शांत झाला - एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “चार पिढ्यांच्या मनाला स्पर्श करणारा हा दिव्य आवाज आज कायमचा शांत झाला.” त्यांनी सांगितले की, अनेक दशकांपासून असा एकही दिवस गेला नाही, ज्यादिवशी त्यांच्या आवाजाने श्रोत्यांना आनंद दिला नाही. त्यांच्या आठवणी कायम जिवंत राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

संगीतातील सुवर्णयुगाचा अंत - सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आशा भोसले यांच्या निधनाला संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाचा अंत असे संबोधले. "मेलडीची सम्राज्ञी" म्हणून त्यांची ओळख करून देत, त्यांच्या गाण्यांतील भावनिक खोली आणि विविधतेचे त्यांनी कौतुक केले. त्यांचा प्रवास हा चिकाटी आणि समर्पणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.

आशिष शेलार यांची भावनिक प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अतिशय भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली. "आज मी माझ्या मोठ्या बहिणीला गमावले," असे ते म्हणाले. भक्तिगीतांपासून कॅब्रे आणि लोकसंगीतापर्यंत सर्व प्रकारात त्यांनी गायन करत भाषेच्या सीमा ओलांडल्या आणि अमर ठेवा मागे ठेवला, असे त्यांनी नमूद केले.

आशाताई - दि लास्ट एम्परर - राज ठाकरे

"भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला" असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आशा भोसले यांना आदरांजली अर्पण केली. "मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील." अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

मुंबई महापौरांची प्रतिक्रिया

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या घटनेला "अत्यंत वेदनादायी" म्हटले. महिलांसाठी आव्हानात्मक काळात जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांचे त्यांनी कौतुक केले. त्यांच्या आवाजामुळे प्रत्येक गाण्याला वेगळी भावना आणि अर्थ मिळाला, असेही त्यांनी सांगितले.

आवाज अमर राहील

आशा भोसले आता शारीरिकरित्या आपल्या सोबत नसल्या, तरी त्यांचा आवाज आणि वारसा कायम येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशी भावना अनेक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन; वयाच्या ९२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या मुंबईत होणार अंत्यसंस्कार

Asha Bhosle Last Public Appearance : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या लग्नात हजेरी; हसतमुखाने पापाराझींना केला नमस्कार, VIDEO

Asha Bhosle : स्वर हरपला… पण वारसा अमर! गिनीज रेकॉर्डने जग जिंकणाऱ्या आशा ताईंची अफाट कारकीर्द जाणून घ्या

मुंबईत काही भागांत गुरुवारी पाणीपुरवठा बंद; शिवडीत 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसवण्याचे काम हाती घेणार

RTE प्रवेशाची निवड यादी जाहीर; राज्यात १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांना प्रवेश