मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील कामकाजाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला असला तरी विरोधी पक्षाकडून हे प्रकरण लावून धरले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाणार आहे.
गुढीपाडवा आणि रमजान ईद तसेच शनिवार, रविवार अशा सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचे कामकाज तीन दिवस म्हणजे २५ मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशन शेवटच्या टप्प्यात असताना नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आले आहे. आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरातचा भांडाफोड होताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. खरातशी जवळीक ठेवल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला आहे. त्याशिवाय खरात प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्यात आले आहे.
नेते, अधिकाऱ्यांच्या संपर्कामुळे गांभीर्य वाढले
अशोक खरात सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची छायाचित्रे समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही खरात प्रकरणावरून आरोप होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचेही खरातसोबतचे छायाचित्र आहे. याशिवाय मुंबईतील उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे - पाटील यांच्या पत्नीची अशोक खरातच्या पत्नीसोबतची भागीदारी उघड झाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रशासनातील अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून सोमवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चेची मागणी होऊ शकते. सरकारने ही चर्चा फेटाळली तर विरोधी पक्ष आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाचे संसदीय आयुध असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेवेळी विरोधक खरात प्रकरणावरून राज्य सरकारला लक्ष्य करण्याच्या तयारीत दिसत आहेत.