भोंदूबाबा अशोक खरातवर ED चा गुन्हा दाखल; कोट्यवधींच्या अफरातफरीचा संशय 
महाराष्ट्र

भोंदूबाबा अशोक खरातवर ED चा गुन्हा दाखल; कोट्यवधींच्या अफरातफरीचा संशय

नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला...

Swapnil S

मुंबई : नाशिकसह राज्यातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक आणि इतर शहरांमध्ये दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांची (एफआयआर) दखल घेत ईडीने ही कारवाई केली.

ईडीने या प्रकरणी माहिती अहवाल नोंदवून चौकशी सुरू केली आहे. समता नागरी पतसंस्थेसह विविध सहकारी पतसंस्थांशी संबंधित १३० हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची तपासणी केली जात आहे. या खात्यांमधून ६३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची अफरातफर झाल्याचा संशय असून, निधीचा मूळ स्रोत लपवण्यासाठी ही गुंतागुंतीची आर्थिक रचना तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक खात्यांमध्ये खरातचे नाव नॉमिनी म्हणून आहे आणि ही खाती त्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून चालवली जात होती. हे सर्व व्यवहार खरातच्या थेट नियंत्रणाखाली होते, असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.

खरातशी संबंधित रिअल इस्टेट पोर्टफोलिओवरही तपास यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे, ज्याचे बाजारमूल्य २०० कोटी ते १,५०० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

नाशिक, शिर्डी आणि पुणे परिसरात खरातने अंधश्रद्धेचा आधार घेऊन मालमत्ता मालकांमध्ये भीती निर्माण केली आणि बाजारभावापेक्षा कमी किमतीत या मालमत्ता बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला आढळले की, मालमत्ता मालकांना मानसिक दडपणाखाली आणून त्यांच्याकडून सक्तीने विक्री करून घेणे ही खरातची कार्यपद्धती होती.

खरातची मुलगी सृष्टी खरात हिच्या नावावर असलेल्या पुण्यातील मॉडेल कॉलनीतील १.२ कोटी रुपयांच्या आलिशान फ्लॅटचीही ईडीकडून छाननी केली जात आहे, ज्यासाठी कोणताही कायदेशीर पेमेंट पद्धत आढळली नाही.

खरातने अनेक व्यापाऱ्यांना जागतिक व्यवसायासाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचाही आरोप आहे. सध्या खरात बलात्कार आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत नाशिक पोलिसांच्या कोठडीत असून, ईडीच्या प्रवेशामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Baramati By-Election: सुनेत्रा पवारांसह ५५ अर्ज; काँग्रेसशी चर्चेवरून राष्ट्रवादीतच मतभेद

US-Iran-Israel War : ट्रम्पच्या मुदतीचे उरले काही तास; इराणने शांतता प्रस्ताव फेटाळला, संघर्ष चिघळण्याची शक्यता

अशोक खरातच्या कॉल डेटासाठी AI चा वापर; अंजली दमानियांचा दावा

संघर्षातून फुललेल्या ‘कमळा’चा महाराष्ट्रातील प्रवास

आजचे राशिभविष्य,७ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत