महाराष्ट्र

बारामतीत काँग्रेसचा उमेवार जाहीर; सुनेत्रांचा फोन निष्फळ, काँग्रेसतर्फे आकाश मोरे

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. काँग्रेसतर्फे एड. आकाश विश्वनाथ मोरे यांना रात्री उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Swapnil S

मुंबई/पुणे : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. काँग्रेसतर्फे एड. आकाश विश्वनाथ मोरे यांना रात्री उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. पण तूर्त तरी ते वाया गेल्याचे दिसते.

आकाश मोरे हे काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार विजयराव मोरे यांचे चिरंजीव असून धनगर समाजाचे आहेत असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

त्यापूर्वी आपण स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करून पाठिंबा देण्याची विनंती करणार आहोत असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले होते. तर सुनेत्रा यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनाही त्यांनी फोन करून तशी विनंती केली. महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि महायुतीतील इतर महत्त्वाचे मंत्री उपस्थित असतील अशी माहिती तटकरे यांनी दिली. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी हजर राहणार नाहीत.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनीही आपण बारामतीत अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. केवळ ओबीसी बांधवांचे प्रश्न आणि आरक्षणाचा मुद्दा मांडण्यासाठी आपण ही निवडणूक लढवणार आहोत असे ते म्हणाले.

महत्त्वाचे मुद्दे

उद्धव ठाकरेंनाही साकडे: सुनेत्रा पवार यांनी एक दिवसापूर्वी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन पाठिंबा मागितला होता. जानेवारी महिन्यात विमान अपघातात पती आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

पवारांची भूमिका: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आधीच जाहीर केले आहे की, दिवंगत अजित पवार यांच्याबद्दलचा आदर म्हणून ते ही पोटनिवडणूक लढवणार नाहीत.

काँग्रेसची रणनीती: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या स्वतः बारामतीमध्ये उपस्थित राहून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल करून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २३ एप्रिल रोजी ही निवडणूक होणार आहे.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा अडचणीत; जळीत नोटांप्रकरणातील आरोप सिद्ध, संसदीय चौकशी समितीचा अहवाल

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग