पुणे : मौजे पेरणे येथे येत्या १ जानेवारी २०२६ रोजी होणारा २०९ वा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे २० लाख भीम अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता असून, त्यांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भीमा-कोरेगाव विजयस्तंभ दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे.
अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी, वाहनतळ, स्वच्छतागृहे आदी सर्व पायाभूत सुविधा यंदा मागील वर्षांपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसोबत समन्वय समिती व समाजबांधवांच्या सहा पेक्षा अधिक बैठका पार पडल्या असून, नागरिकांकडून प्राप्त सूचनांच्या आधारे अंतिम नियोजन करण्यात आले आहे. यंदाचे नियोजन अधिक दर्जेदार व सुविधा-संपन्न राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत असून, समाजकंटक व चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फेस-स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय, यापूर्वी घडलेल्या अप्रिय घटनांचा अनुभव लक्षात घेता, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस दलामार्फत तब्बल १३ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि गोंधळ टाळणे याला प्राधान्य देत सुरक्षा व्यवस्थेत सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
वाहतुकीवर बदल
भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसरात विजयस्तंभ कार्यक्रम पार पडणार असल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. चाकण-शिक्रापूर-शिरूर मार्गे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने पर्यायी मार्गांद्वारे वळविली जातील. वाघोली चौक, पेरणे फाटा, भारतमाता चौक व मोशी चौक मार्गे भीमा कोरेगावकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. चाकण-शिक्रापूर-शिरूर मार्ग फक्त अत्यावश्यक सेवा वाहतुकीसाठी खुला राहील; इतर वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिक, भाविक व वाहनचालकांना निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे, नियमांचे पालन करण्याचे आणि अनावश्यक वाहनें घेऊन भीमा-कोरेगाव परिसरात येऊ नये, असे आवाहन केले आहे. वाहतूक बदलाबाबत माहिती फलक, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि मार्गदर्शन पथके तैनात करण्यात आले आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या मानवंदनेचे शताब्दी वर्ष
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला दिलेल्या भेटीला येत्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदाचे वर्ष हे बाबासाहेबांच्या मानवंदनेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. या शताब्दी वर्षाची औपचारिक सुरुवात १ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, यानिमित्ताने बाबासाहेबांसोबत विजयस्तंभावर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या कुटुंबीयांचे संयुक्त अभिवादन करण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
निवृत्त सैनिकांकडून महार रेजिमेंटला मानवंदना
शौर्यस्तंभावरून प्रेरणा घेऊन महार रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली केली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक लष्करी इतमामाने विजयस्तंभावर मानवंदना देतात. यंदा यशसिद्धी आजी-माजी सैनिक फाऊंडेशनच्या वतीने सुमारे ३,००० निवृत्त सैनिकांकडून राष्ट्रगीताद्वारे महार रेजिमेंटला मानवंदना देण्यात येणार आहे.