छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेतील आमदारांनीच नाराजी व्यक्त केल्याने पक्षांतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. विशेषतः आमदार अब्दुल सत्तार यांनी निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आणि राजकीय त्रास दिला जात असल्याचा आरोप करत थेट पालकमंत्री बदलण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अब्दुल सत्तार यांच्या प्रभावाखाली मानली जाणारी जिल्हा बँक आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने मंत्री अतुल सावे यांना मैदानात उतरवले आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संघर्ष सध्या तरी शमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आतापर्यंत अब्दुल सत्तार यांच्या प्रभावाखाली मानली जाणारी जिल्हा बँक आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने मंत्री अतुल सावे यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता शिवसेना आणि भाजप यांच्यातील शक्तिपरीक्षेचे केंद्र बनण्याची चिन्हे दिसत आहेत.
महायुतीचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता
एकीकडे पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत अंतर्गत असंतोष वाढत असताना, दुसरीकडे जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने टाकलेली रणनीतिक चाल आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महायुतीचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि जिल्हा बँकेची निवडणूक या दोन्ही घडामोडी महायुतीतील अंतर्गत शक्तिसंतुलनावर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात. शिवसेना आणि भाजपमधील समन्वयाची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे.