अमित ठाकरे 
महाराष्ट्र

माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यावर भाजप ठाम

भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे ठरविले असून पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे फडणवीस म्हणाले. या तिढ्यावर उपाय काय, असे विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल तेव्हा त्यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल.

Swapnil S

मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील सत्तारूढ शिवसेनेचा उमेदवार रिंगणात असला तरी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांनाच पाठिंबा द्यावा असा भाजपमध्ये मतप्रवाह आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. तथापि, या मतदारसंघात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाल्याने या मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये वादंग होण्याची लक्षणे दिसत आहेत.

दरम्यान, 'पार्टी विथ डिफरन्स' असे म्हणणाऱ्या भाजपलाही बंडखोरीना ग्रासले आहे. त्यामुळे बहुसंख्य बंडोबांना थंडोबा करण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, परंतु काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होणे अटळ आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेनेने (उबाठा) महेश सावंत यांना येथून उमेदवारी दिली आहे. मनसे हा महायुतीचा घटक पक्ष नसला तरी त्या पक्षाचे नेते राज ठाकरे यांनी अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता.

मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतैक्य आहे. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तथापि, पक्षाने निवडणूक लढविली नाही तर पक्षाचे निष्ठावान मतदार शिवसेनेकडे (उबाठा) वळतील, असे शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे ठरविले असून पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असेही फडणवीस म्हणाले.

या तिढ्यावर उपाय काय, असे विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल तेव्हा त्यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. बहुसंख्य बंडखोरांना शांत करण्याचा पक्ष प्रयत्न करील, मात्र काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असेही ते म्हणाले.

आर. आर. पाटलांबाबत आता भाष्य करणे उचित नाही !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकेकाळचे सहकारी दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केले, त्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, काँग्रेस आणि एकत्रित राष्ट्रवादीच्या राजवटीत अजित पवार यांच्याविरुद्धची चौकशी सुरू झाली ही बाब खरी आहे. मात्र आर. आर. पाटील हे आता हयात नसल्याने त्यांच्याबद्दल आपण भाष्य करणार नाही, ते उचितही नाही, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी