महाराष्ट्र

सोलापुरात ११ पैकी १० पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती; सांगोल्यात ५५ वर्षांची शेतकरी कामगार पक्षाची सत्ता गेली

सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींच्या गुरूवारी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे.

Swapnil S

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींच्या गुरूवारी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवले आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्ह्यातील ११ पैकी दहा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवला. आज झालेल्या सभापती निवडीत माळशिरस वगळता इतर सर्व पंचायत समितीवर भाजपचा सभापती बसला आहे. तर, सांगोल्यात दीपक साळुंखे यांच्या तीन सदस्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर येथे ५५ वर्षांची शेतकरी कामगार पक्षाची सत्ता उलथवून येथे भाजप - शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यानंतर सांगोल्यात शहाजीबापू पाटील, दीपक आबा साळुंखे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत विजयाचा गुलाल उधळला.

सांगोला पं. स. सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले

सोलापूर जिल्ह्यातील शेकापचे नेते तथा दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोल्याचा गड आजवर अभेद्य ठेवला होता. मात्र, यावेळेला शेकापसोबत निवडणूक लढलेल्या दीपक साळुंखे - पाटील गटाच्या तीन पंचायत समिती सदस्यांनी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश केल्याने सांगोल्यात सत्तांतर झाले. सांगोला पंचायत समिती सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे अजय सरगर यांची निवड झाली आहे.

पंढरपूर पंचायत समितीही भाजपकडे

पंढरपूर पंचायत समितीमध्येही सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडे समसमान मते होती. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य प्रमोद हरी देशमुख यांनी व्हीप झुगारून भाजपला साथ दिल्याने ९ विरुद्ध ७ मतांनी भाजपचे डॉक्टर शुभम आगलावे हे सभापतीपदी विजयी झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमोद देशमुख यांना उपसभापती पद मिळाले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र भाजपने केला जल्लोष

माळशिरस या मोहिते - पाटलांचा बालेकिल्ल्यामध्ये भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महायुतीतील शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन सत्ता आणली होती. याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे दत्ता मगर यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मनीषा पाटील यांची उपसभापती पदावर निवड झाली आहे. माळशिरस वगळता सर्व दहा पंचायत समित्यांवर भाजपने आपला सभापती बसविला असून सात ठिकाणी भाजपचाच उपसभापती तर दोन ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एक ठिकाणी शिंदे सेनेचा उपसभापती झाला आहे. या निवडीनंतर जिल्ह्यात सर्वत्र भाजपने मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे.

बार्शीतही भाजपचे निर्विवाद वर्चस्व

दरम्यान, महाआघाडीचा प्रयोग फसलेल्या बार्शीतही भाजपच्याच सभापती आणि उपसभापतीची निवड झाली आहे. भाजपने मिनाक्षी रोंगे सभापती आणि संतोष निंबाळकर उपसभापती बनले आहेत. येथे, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी एकत्र येत महाआघाडीचा प्रयोग झाला होता. मात्र, भाजपने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प थेट महासभेत; त्याच दिवशी परिवहन सेवेचाही अर्थसंकल्प; २३ मार्चला विशेष सभेत सादरीकरण

मुंबई विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर; १७२ कोटी ६३ लाखांची तूट; १०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

राज्यातील हजारो करदात्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Mumbai : नायरमध्ये अन्नपदार्थाच्या गुणवत्तेशी तडजोड नाहीच; अधिसेविका कार्यालयाकडून तपासणी

सिलिंडर तुटवड्याचा सुवर्ण व्यवसायाला फटका; जळगावात दागिने तयार करण्याचे काम ठप्प