तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण  
महाराष्ट्र

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

राज्यात एलपीजी सिलेंडर आणि इंधन तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडली.

Swapnil S

नाशिक : ‘काही शहरांमध्ये पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही अनेक नागरिकांनी त्यासाठी अर्ज केलेला नाही. अशा ठिकाणी, जर ‘पीएनजी’ लाईन पूर्णपणे कार्यान्वित झाली आणि नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत अर्ज केला नाही, तर त्या भागात ‘एलपीजी’ सिलिंडर सेवा बंद केली जाऊ शकते. मात्र, हा नियम संपूर्ण राज्यासाठी लागू नसून केवळ पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरी भागांपुरता मर्यादित असेल’, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट कले. तसेच,राज्यात कोणत्याही प्रकारचा गॅस किंवा इंधन तुटवडा नसून भारत सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

अफवांवर विश्वास ठेवू नये...

राज्यात एलपीजी सिलेंडर आणि इंधन तुटवड्याच्या अफवा वेगाने पसरत असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ज्या नागरिकांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे पण अद्याप लाईन पोहोचलेली नाही, त्यांना एलपीजी सेवा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतात परिस्थिती नियंत्रणात...

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. रशिया आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून इंधन पुरवठा सुरू असून भारतीय जहाजे नियमितपणे ये-जा करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे त्यांनी नमूद केले. त्याशिवाय, व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. एलपीजी साठाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

रेशन धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध

दरम्यान, राज्यात रेशन धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. केरोसीनही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीएनजी लाईनसाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज नसून सरकारच ती सुविधा देणार आहे. तसेच, राज्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिला आहे.

Iran vs US-Israel War : ट्रम्प यांचा पुन्हा 'हल्लाबोल'; लवकर शांतता तह करा, अन्यथा, 'उद्ध्वस्त' करू- इराणला इशारा

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

सुनेत्रा पवारांचा भाजपला दणका; पालकमंत्री होताच पुण्यातील महत्त्वाचे कार्यालय बारामतीला हलवले

SIT चौकशीला रुपाली चाकणकरांची दांडी

संभाजीनगरात LPG टंचाई; दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल