छगन भुजबळ संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

भुजबळ दिल्लीत जाणार ? राजकीय हालचालींना वेग

येवला लासलगाव मतदारसंघाची विधानसभेत सलग पाचवी टर्म सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजाचे कणखर नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असून येत्या दोन दिवसांत त्याचा फैसला अपेक्षित आहे.

Swapnil S

लासलगाव : येवला लासलगाव मतदारसंघाची विधानसभेत सलग पाचवी टर्म सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजाचे कणखर नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असून येत्या दोन दिवसांत त्याचा फैसला अपेक्षित आहे. पक्षश्रेष्ठींनी जर राज्यसभेची जबाबदारी भुजबळांना दिली, तर त्यांच्या अनुपस्थितीत येवला लासलगाव मतदारसंघाचे नेतृव आणि मंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्यात असल्याने याबाबत मुंबईत जोरदार हालचाली सुरू असून माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव आघाडीवर चर्चेत आहे.

समीर भुजबळ अनेक वर्षापासून येवला-नाशिक परिसरात सक्रिय राजकारण करत संघटनात्मक कामात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकसभेत नाशिकचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी पक्ष संघटना आणि मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवत गेल्या काही महिन्यांपासून येवला लासलगाव मतदारसंघ ते पिंजून काढत आहे.

छगन भुजबळ हे ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी राज्यात सातत्याने लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. राज्यसभेत गेल्यास त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत येवला मतदारसंघात त्यांच्या राजकीय वारशाची जबाबदारी समीर भुजबळ यांच्याकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

समीर भुजबळ गेल्या काही महिन्यांपासून येवला तालुक्यात आणि निफाड तालुक्यातील ४२ गावात स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकां बरोबर आढावा बैठक विकास कामांचा पाठपुरावा करण्यात प्राधान्यक्रम देत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते. येवला मतदारसंघातील विकासकामे, जनसंपर्क आणि भुजबळ कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने छगन भुजबळ दिल्लीला गेल्यास येवल्याच्या राजकारणात समीर भुजबळ यांची भूमिका अधिक प्रभावी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

समीर भुजबळांना राज्य मंत्रिमंडळात संधी?

दरम्यान, छगन भुजबळ हे केंद्रात (राज्यसभेत) जाण्यास तयार असले, तरी त्यांनी राज्यात आपल्या वाट्याचे मंत्रिपद आणि आमदारकी कुटुंबातच राहावी, असा आग्रह धरल्याचे समजते. केंद्रात स्वतः छगन भुजबळ आणि राज्यातील त्यांच्या जागेवर समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवल्याची माहिती आहे.

येवल्यात पोटनिवडणूक लागणार?

छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात पोटनिवडणूक लागेल. या निवडणुकीसाठी भुजबळ यांच्याकडून त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना रिंगणात उतरवले जाऊ शकते. त्यामुळे आता छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळते का? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

'झुरळे' अखेर रस्त्यावर! कॉकरोच पार्टीचे जंतरमंतरवर आंदोलन; धर्मेंद्र प्रधानांना राजीनाम्यासाठी ७ दिवसांची मुदत

'मृगा'च्या आधीच मान्सून कोकणात; वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरुवात

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

अंधेरी क्रीडा संकुल की लॉजिंग अँड बोर्डिंग? ५०हून अधिक खोल्यांमध्ये गैरप्रकार, BMC चौकशी करणार, महापौरांचे कारवाईचे आदेश

निवडणूक घोडेबाजार : संसदेत विधेयक आणणार; सुप्रिया सुळे यांची माहिती