सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी चिपी-नवी मुंबई विमानसेवा येत्या सोमवार, १६ नोव्हेंबरपासून नियमित सुरू होणार आहे. फ्लाय ९१ कंपनीच्या माध्यमातून आठवड्यातील सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार असल्याने सिंधुदुर्गचा मुंबईशी थेट हवाई संपर्क निर्माण होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्यासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गवासीयांना संबोधित करताना राणे म्हणाले की, १९९९ मध्ये तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला होता. शेती आणि मासेमारीबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढावे आणि आर्थिक समृद्धी साधता यावी, हा त्यामागील उद्देश होता. पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्याला स्वतःचे विमानतळ असावे, या विचारातून एमआयडीसीच्या माध्यमातून चिपी वेंगुर्ला येथे विमानतळाची उभारणी करण्यात आली. विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईसह विविध ठिकाणांहून विमानसेवाही सुरू झाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे कालांतराने ही सेवा बंद पडली.
विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे आणि विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळासाठी हा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे विमान कंपन्यांना या विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून १६ नोव्हेंबरपासून फ्लाय ९१ कंपनीची चिपी-नवी मुंबई विमानसेवा सुरू होत आहे.