महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांकडून एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला आहे. याशिवाय जे जे मार्ग पोलीस ठाण्यातही असाच मेल आला आहे. मेल मिळाल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 'एएनआय' वृत्तसंस्थेने सोशल मीडिया पोस्टवरून याची माहिती दिली आहे.
मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा याचा तपास करत आहे. पोलीस ज्या मेल आयडीने धमकी देण्यात आली आहे त्या मेलचा आयपी अॅड्रेस ट्रॅक करत आहेत. या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत आहेत. आमदार रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आज हा मेल मिळाल्यानंतर सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा अतिशय कडक करण्यात आली आहे.