पुणे : नीट परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास वीस जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा कॉकरोच जनता पार्टीने दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात गुरुवारी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून होणार असून, त्यानंतर लखनऊ, अमृतसर, जयपूर आणि बिहार यांसारख्या शहरांमध्येही आंदोलने केली जातील.
पुण्यात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संघटनेचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारला इशारा दिला की, जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर येत्या २० जून रोजी देशभरातील तरुण दिल्लीत एकत्र येतील आणि राजीनामा घेतल्याशिवाय परत जाणार नाहीत.
मला व कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्मया येत आहेत. माझे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले, अकाऊंट बंद केले. कॉक्रोचना मारण्यासाठी हीट आणून ठेवले आहे, अशी भाषा केली जात आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही. तुमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. माझी विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे, की कुणीही आपल्या मुलांना रोखू नये. आपल्या भविष्यासाठी शांततेच्या मार्गाने लढण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांचा आवाज दडपू नका, असे आवाहन त्याने पालकांना उद्देशून केले.
आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला सोबत घेणार नाही. तथापि, विद्यार्थी हिताच्या मुद्यावर आम्हाला राजकीय पक्ष पाठिंबा देऊ शकतात. खरे तर कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळच आहे. आमच्या आंदोलनास परदेशातून अर्थसहाय्य मिळत असल्याचा कांगावा करून दहशतवादी प्रवृत्तीकडून मदत घेतली जात असल्याचा अपप्रचार केला जात आहे, असे नमूद करतानाच लवकरच आमच्या मूव्हमेंटच्या नियुक्त्या केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेत परत जाणार नाही
पुण्याच्या आंदोलनाला दिल्लीतील आंदोलनापेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल. जेलमध्ये जाण्याचीही आमची तयारी आहे. एकट्या दुकट्याने काही होणार नाही. लाखो विद्यार्थी बोलतील, तेव्हाच सरकारपर्यंत आवाज पोहोचेल, असा विश्वासही दीपके यांनी व्यक्त केला.
यापुढे देशात राहणार की अमेरिकेत, असा प्रश्न केला असता मी यापुढे देशातच राहणार आहे. अमेरिकेला परत जाणार नाही. अमेरिकेत मी नोकरी करून स्थायिक होणार होतो. परंतु पक्षाचे काही हितचिंतक साथीदार होते, त्यांनी ही चळवळ पुढे नेण्याचे ठरवले. त्यामुळे हा निर्णय घेतला, असे उत्तर त्यांनी दिले.