नाशिक : हिमालयातील गोठवणाऱ्या थंड पाण्यात पोहणे, ढगांना स्पर्श करणाऱ्या पर्वतीय मार्गांवर सायकलिंग आणि खडतर ट्रेल रन करत नाशिकच्या डॉ. देविका पाटील यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाइव्ह ही जगातील अत्यंत कठीण मानली जाणारी एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करून पहिल्या भारतीय महिला तसेच केवळ दुसऱ्या भारतीय म्हणून मानाचा बहुमान मिळवला आहे. ही स्पर्धा नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतरांगांच्या सान्निध्यात पार पडली.
विशेष म्हणजे, डॉ. देविका पाटील या व्यावसायिक खेळाडू नसून नाशिक येथील 'स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक' मध्ये मनोचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. रुग्णसेवा, क्लिनिकची जबाबदारी आणि दैनंदिन व्यस्त वेळापत्रक सांभाळत त्यांनी या जागतिक दर्जाच्या कठीण स्पर्धेसाठी तयारी केली. त्यामुळे त्यांचे हे यश केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित न राहता जिद्द, शिस्तबद्ध वेळ व्यवस्थापन आणि मानसिक ताकदीचे प्रतीक ठरले आहे.
या स्पर्धेत सलग तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. यात १.९ किलोमीटर खुल्या पाण्यात पोहणे, त्यानंतर ९० किलोमीटर सायकलिंग आणि शेवटी २१ किलोमीटर ट्रेल रनचा समावेश असतो. सायकलिंगदरम्यान सुमारे २,४०० मीटर उंचीचा चढ, तर धावण्यामध्ये आणखी १,७४० मीटर उंचीचा चढ पार करावा लागतो. एकूण ४,१४० मीटर उंचीचा हा प्रवास अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. ही स्पर्धा सामान्य ट्रायथलॉनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सपाट रस्ते किंवा नियंत्रित वातावरणाऐवजी स्पर्धकांना नेपाळच्या खडकाळ व डोंगराळ भागातून मार्गक्रमण करावे लागते. विरळ हवा, सततचे चढ-उतार आणि कठीण हवामानामुळे ही स्पर्धा अधिक कठीण ठरते. विशेष म्हणजे, स्पर्धकांना कोणतीही बाह्य मदत मिळत नाही आणि संपूर्ण शर्यत स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण करावी लागते.
ही स्पर्धा 'एक्स्ट्री वर्ल्ड टूर'चा भाग असून नॉर्वे, स्कॉटलंडसह विविध देशांमध्ये अशा एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात. नेपाळमधील ही शर्यत पोखरा येथील फेवा तलाव परिसरात पार पडली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना 'एक्स-पॉइंट्स' मिळतात, ज्याच्या आधारे 'नॉर्समन' आणि 'सेल्टमन' सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रवेशाची संधी मिळते.
चार महिन्यांची कठोर तयारी
डॉ. पाटील यांनी या स्पर्धेसाठी चार महिने कठोर सराव केला. क्लिनिकच्या वेळांपूर्वी पहाटे सराव, सुट्टीच्या दिवशी घाटरस्त्यांवर सायकलिंग आणि रात्री पोहण्याचे सत्र असा त्यांचा दिनक्रम होता. हिमालयातील चढ-उतारांसाठी तयारी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील अंबोली घाट आणि कसारा घाट येथे सातत्याने सायकलिंगचा सराव केला. त्यासोबत नियमित पोहणे आणि ट्रेल रनिंगचाही सराव त्यांनी केला. घाटांवरील प्रत्येक चढ हा शर्यतीसाठीची गुंतवणूक होती. या तयारीने मला मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर सक्षम केले, असे डॉ. देविका पाटील यांनी सांगितले.
पुढील लक्ष्य पूर्ण अंतराची स्पर्धा
हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाइव्ह ही मुख्य हिमालयन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेची अर्धी आवृत्ती मानली जाते. पूर्ण स्पर्धेत रात्री पोहणे, ५,३०० मीटरपेक्षा अधिक उंचीचा सायकलिंग प्रवास आणि अन्नपूर्णा परिसरातील अधिक कठीण ट्रेल रनचा समावेश असतो. पुढील वर्षी पूर्ण अंतराची स्पर्धा पूर्ण करण्याचे माझे लक्ष्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.