महाराष्ट्र

'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ५ लाखांची मागणी, डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण; अखेर अटक

'बिग बॉस मराठी' फेम दिव्या शिंदेला पुण्यात अटक करण्यात आली आहे. निमंत्रण नसतानाही कार्यक्रमात गेल्यानंतर प्रसिद्धी केल्याचे सांगत निवृत्त डॉक्टरांकडे ५ लाख रुपयांची मागणी आणि नंतर घरात घुसून मारहाण केल्याचा तिच्यावर आरोप आहे.

Mayuri Gawade

पुणे : 'बिग बॉस मराठी ६'मधून चर्चेत आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण केल्याचा आणि ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवार (दि.२७) दिव्याला अटक करण्यात आली. मात्र, दिव्या चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. सिंहगड लॉ कॉलेजमधील आंदोलनापासून ते ‘बिग बॉस’च्या घरातील वादग्रस्त वक्तव्यांपर्यंत तिचं नाव याआधीही अनेकदा चर्चेत आलं आहे.

निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे कटक मंडळातील निवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या तक्रारीवरून दिव्या शिंदेला अटक करण्यात आली आहे. तिच्या ८ ते १० साथीदारांविरोधातही काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड हे एका स्वयंसेवी संस्थेचे सदस्य असून या संस्थेतर्फे १ ते ३ सप्टेंबरदरम्यान ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दिव्याला अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र, आपण सोशल मीडियावर कार्यक्रमाची प्रसिद्धी केल्याचा दावा करत तिने गायकवाड यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. दरम्यान गायकवाड यांनी तिला ५० हजार रुपये ऑनलाइन दिल्याचेही सांगितले जाते. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी सुरू राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी दिव्या आपल्या साथीदारांसह गायकवाड यांच्या घरी गेली. ते घरी नसल्याने त्यांच्या पत्नी आणि मुलाला दमदाटी करण्यात आली. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी दिव्याने गायकवाड यांना एका हॉटेलमध्ये बोलावून ५ लाख रुपयांची मागणी करत धमकावल्याचा आरोप आहे.

दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २४ सप्टेंबरच्या रात्री गायकवाड घरी एकटे असताना दिव्या आणि तिचे साथीदार पुन्हा त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी घरात घुसून गायकवाड यांना मारहाण केली आणि घरातील सामानाची तोडफोड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काही वृत्तांनुसार, मारहाणीसाठी काठी आणि बेल्टचा वापर करण्यात आल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी दिव्याला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सिंहगड लॉ कॉलेजच्या आंदोलनातून आली चर्चेत

दिव्या शिंदे सर्वप्रथम सिंहगड लॉ कॉलेजमधील प्रवेशाच्या मुद्द्यावरून चर्चेत आली होती. मेरिटमध्ये नाव आणि आवश्यक कागदपत्रे असूनही प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा करत तिने कॉलेज प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. कॉलेजमध्ये डोनेशन घेऊन श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि गरीब विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप तिने केला होता. आंदोलनातील तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर या प्रकरणाची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली होती.

दिव्या सोशल मीडियावरही सक्रिय असून तिची 'सरकारसेना' नावाची संघटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांनी प्रेरित असल्याचे सांगत ती विविध सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसते.

'बिग बॉस'मध्येही वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चा

यानंतर दिव्या 'बिग बॉस मराठी ६'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. सुरुवातीला तिच्या खेळाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला. मात्र, तन्वी कोलतेसोबत झालेल्या वादानंतर तिचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं. आपण बाहेर ‘सरकार’ म्हणून वावरतो आणि हातात तलवार ठेवतो, असं तिने म्हटलं होतं. घराबाहेर गेल्यानंतरही आपण गोष्टी विसरणार नाही, अशा आशयाचं वक्तव्यही तिने केलं होतं. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. त्यानंतर दिव्याचा 'बिग बॉस'मधील प्रवासही संपला.

आता निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण आणि खंडणी मागितल्याच्या आरोपामुळे दिव्या पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिच्यावरील आरोपांबाबत पुढील पोलिस तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोन्या-चांदीच्या बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता; अमेरिकेची आकडेवारी, पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम राहणार

Mumbai : २,७५४ मेट्रिक टन साहित्य जमा; विसर्जनानंतर ५१० मेट्रिक टन साहित्याची वाहतूक, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून प्रभावी सेवा

ओपन एआयने थांबवला टूलचा वापर; AI एजंटची कंपनी इंटरनेट निर्बंधांवर मात

Mumbai : गणेशोत्सवात लालबाग-परळमध्ये चप्पल बुटांचा खच; आठ मेट्रिक टन चप्पल-बूट जमा, पुनर्प्रक्रियेनंतर गरजूंना होणार वाटप

Mumbai : ‘त्या’ रहिवाशांच्या संक्रमण भाड्यात कपात