विजय गायकवाड
ज्येष्ठ पत्रकार व कृषी अभ्यासक
यंदा पावसाने दगा दिला, हे खरे. पण शेतकऱ्याला फसवले ते फक्त पावसाने नाही. मोबाईलवर रोज येणाऱ्या ‘पक्क्या’ अंदाजांनीही त्याची फसगत केली. ‘अमुक तारखेपासून राज्यभर धो-धो पाऊस’, ‘यंदा पाऊस भरपूर, पेरणीची घाई करा’ असे संदेश, ध्वनिफिती आणि व्हिडीओ व्हॉट्सॲपवरून गावागावांत फिरत होते. त्यावर भरवसा ठेवून अनेकांनी उसनवारी करून बियाणे-खते आणली आणि पेरण्या उरकल्या. पाऊस काही आला नाही. काहींवर दुबार पेरणीची वेळ आली, तर काहींनी उभ्या पिकात नांगर फिरवला.
स्वतःला हवामानतज्ज्ञ म्हणवणाऱ्या काही मंडळींचे अंदाज यंदा सपशेल फसले. पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर पावसाची हमी देणाऱ्यांनीच सप्टेंबरअखेरीस अंदाज चुकल्याचे मान्य केले.
आता ते दुष्काळ पडणार, असे सांगू लागले आहेत. विदर्भात तर दिवसातून चार-चार वेळा अंदाज बदलले गेले. सकाळी एक, दुपारी दुसरा, रात्री तिसराच. पिकाला पाणी द्यायचे की फवारणी करायची, हेच शेतकऱ्याला कळेनासे झाले. मानोरा परिसरात अशा तथाकथित अभ्यासकांवर कारवाई करा, अशी मागणी आता उघडपणे होऊ लागली आहे.
शास्त्र काय सांगते?
भारतीय हवामान विभाग ही काही आजकालची संस्था नाही. जगभरात तिला मान आहे. विभागाकडे सव्वाशे वर्षांहून अधिक काळाच्या पावसाच्या नोंदी आहेत. शंभर वर्षांपूर्वी याच विभागाचे महासंचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी मान्सूनचे जागतिक धागेदोरे शोधून काढले होते. आज उपग्रह, रडार आणि सुपरकॉम्प्युटरच्या आधारे अंदाज तयार होतात. मात्र भारतीय मान्सून सरळसोट नाही. प्रशांत महासागरातील एल-निनो, हिंदी महासागरातील आयओडी, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिमालय या सगळ्यांचा त्यावर परिणाम होतो. त्यामुळे युरोप-अमेरिकेत मिळतो तसा तंतोतंत अंदाज इथे देता येत नाही. चार महिने आधी गावनिहाय तारीख सांगणे तर निव्वळ अशक्य आहे.
भारतीय हवामान विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांच्याशी या विषयावर माझे बोलणे झाले, तेव्हा त्यांनीही हाच मुद्दा मांडला. एल-निनो आला म्हणजे दुष्काळ आणि ला-निना आला म्हणजे सुकाळ, असे गणित मांडता येत नाही, असे ते सातत्याने सांगत आले आहेत.
यंदा हवामान विभागाने १३ एप्रिललाच देशात सरासरीच्या ९२ टक्के, म्हणजे कमी पावसाचा अंदाज दिला होता. हा इशारा वेळेत आला होता, पण तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचलाच नाही. त्याच्यापर्यंत पोहोचले ते 'भरपूर पावसाचे' व्हिडिओ.
पाऊस किती, यापेक्षा किती दिवस?
निवृत्त सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी कृषी अपर मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी पुण्यातील एका व्याख्यानात नेमक्या दुखऱ्या जागेवर बोट ठेवले. 'भरपूर पाऊस पडणार' असे सांगून शेतकऱ्याचे काही भले होत नाही. पावसाचे प्रत्यक्ष दिवस किती असतील, हे सांगणे जास्त महत्त्वाचे आहे. चार दिवसांत महिनाभराचा पाऊस कोसळला आणि नंतर तीन आठवडे उघडीप पडली, तर कागदावर सरासरी भरते. पण शेतात पीक जळून जाते. यंदा अनेक भागांत शेतकऱ्यांनी हेच भोगले.
सरकारने आता तरी जागे व्हावे
चुकीच्या अंदाजांची किंमत शेतकरी आपल्या खिशातून मोजतो आहे. त्यामुळे हा विषय आता गंमतीचा राहिलेला नाही. हवामानाच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी सरकारने नियम करावेत. सार्वजनिकपणे अंदाज देणाऱ्याला त्याचा शास्त्रीय आधार सांगणे बंधनकारक असावे.
पण केवळ बंदी घालून भागणार नाही. हवामान विभागाचे अंदाज कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सोप्या मराठीत आणि वेळेत गावापर्यंत पोहोचले पाहिजेत. शास्त्रीय अंदाज असूनही ते शेतकऱ्याच्या हातात पडत नाहीत. ही पोकळी जोवर भरली जात नाही, तोवर स्वयंघोषित 'तज्ज्ञां'चे दुकान चालूच राहणार. पाऊस आपल्या हातात नाही. पण पावसाच्या नावावर चाललेला हा बाजार थांबवणे सरकारच्या हातात नक्कीच आहे.
अशास्त्रीय अंदाजांमुळे होते नुकसान
तरीही हा खेळ थांबलेला नाही. रब्बीसाठी ‘निर्णायक परतीचा पाऊस’ अमुक तारखेला येणार, असे दावे आत्ताही सुरू आहेत. याउलट, पुणे वेधशाळेतील निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी ९ ऑक्टोबरलाच पुढील दोन आठवडे राज्यात पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले होते. अशा अशास्त्रीय अंदाजांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.