मुंबई : मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड आकारण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात एफडीएकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा मसाल्यांकडे वळवला आहे. आता मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग मिसळवता येणार नाहीत. मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग मिसळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, हे नियम सर्व उत्पादक, विक्रेते, घाऊक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांना बंधनकारक असतील. अन्नात भेसळ करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच दोषी आढळल्यास १ वर्ष ते ७ वर्षांपर्यंतचा कारावास आणि १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
... तर‘मकोका’ सारखी कठोर कारवाई
या आदेशांनुसार, मसाल्यांमध्ये भेसळ करणे, कृत्रिम रंगांचा वापर करणे किंवा पॅकेटवर खोटे आणि दिशाभूल करणारे दावे करणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘मकोका’ सारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘एफडीए’ने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार हळद, तिखट, मिरची, दालचिनी, काळीमिरी, खसखस यासह सर्वच प्रमुख मसाले आणि मसाल्यांच्या पदार्थांवर कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर पूर्ण बंदी
बाजारात सुट्ट्या मसाल्यांची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. केवळ वैध अन्न परवाना असलेल्यांनाच मसाले विक्री करता येईल. आकर्षक दिसण्यासाठी मसाल्यांमध्ये वापरले जाणारे कृत्रिम रंग, औद्योगिक रंग किंवा अर्क काढलेल्या निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांची भेसळ करण्यास सक्त मनाई आहे. मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या 'इथिलिन ऑक्साईड' या धोकादायक रसायनाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पदार्थांची भेसळ आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांवर थेट परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचं मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
साठवणुकीची जागा स्वच्छ असणे आवश्यक
मसाले उत्पादन आणि साठवणुकीच्या जागी अत्यंत कडक स्वच्छता बाळगणे बंधनकारक आहे. साठवणुकीचा परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा असणे आवश्यक आहे.उत्पादनाच्या पॅकिंगवर दिशाभूल करणारे खोटे दावे करता येणार नाहीत. पॅकेटवर उत्पादन आणि पॅकिंगची अचूक तारीख स्पष्टपणे नोंदवणे बंधनकारक आहे.
रस्त्यांवर मसाले वाळविण्यास मनाई
मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया आणि साठवणूक करताना स्वच्छतेचे कठोर निकष पाळावे लागणार आहेत. सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारे, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्यांजवळ मसाले वाळविण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्पादन व साठवणूक परिसर स्वच्छ, कोरडा आणि कीडमुक्त ठेवणे आवश्यक राहील. मसाल्यांसोबत रसायने, कीटकनाशके, औद्योगिक रंग किंवा इतर हानिकारक पदार्थ साठविण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, केवळ कायदेशीररीत्या अनुमत प्रक्रिया वापरण्याचे निर्देश आहेत.