नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल (Photo-X)
महाराष्ट्र

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Dharashiv : जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतरही अश्विनीचा मानसिक छळ केला जात असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

किशोरी घायवट-उबाळे

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून राष्ट्रीय स्तरावरील महिला माजी कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ (३०) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह सुमारे १०० फूट खोल दरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ३) घडली. या घटनेत अश्विनी आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तिसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ आणि हुंड्यासाठी पैशांचा तगादा होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी अश्विनीच्या पतीसह सासरच्या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन मुलांसह किल्ल्यावर गेली होती अश्विनी

माध्यमांच्या वृत्तानुसार, अश्विनी आपल्या सहा वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि अडीच वर्षांच्या जुळ्या मुली क्रांती व वीरा यांच्यासह नळदुर्ग किल्ल्यावर गेली होती. किल्ल्याच्या उपळी बुरुजाजवळील सुमारे १०० फूट खोल दरीत ही घटना घडली. अश्विनी आणि तिच्या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दोन्ही मुलींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान क्रांतीचा मृत्यू झाला, तर वीरा गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

सासरच्या जाचाला कंटाळल्याचा नातेवाईकांचा आरोप

अश्विनीचा पती आणि सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या जाचाला आणि कौटुंबिक छळाला कंटाळूनच अश्विनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

सोन्याच्या बांगड्या आणि ऑटोसाठी पैशांची मागणी

अश्विनीचे वडील तानाजी शिवाजी मोहिते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आई-वडिलांनी हुंड्यात काहीही दिले नसल्याचे सांगत अश्विनीचा छळ केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच सोन्याच्या बांगड्या आणि ऑटो खरेदी करण्यासाठी पैसे आणावेत, यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतरही अश्विनीचा मानसिक छळ केला जात असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा

या प्रकरणी अश्विनीचा पती, सासरे, सासू आणि आत्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम ८० (हुंडाबळी), १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ८५ (पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून महिलेवर क्रूरता) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

राष्ट्रीय स्तरावर गाजवले कुस्तीचे मैदान

अश्विनी ही मराठवाड्यातील आश्वासक कुस्तीपटू होती. तिने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धांमध्ये पाच सुवर्ण आणि सहा रौप्य अशी एकूण ११ पदके जिंकली होती. माजी कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनीही अश्विनी ही चांगली आणि आश्वासक कुस्तीपटू असल्याचे सांगितले.

मुलांसह माहेरी राहत होती

मृत्यूपूर्वी अश्विनी आपल्या तीन मुलांसह उमरगा तालुक्यातील व्हांताळ येथे माहेरी राहत होती. तिचे वडील तानाजी मोहिते हे व्यवसायाने शिक्षक आहेत. घटनेनंतर अश्विनीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाचा तपास रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष

मेगा IPO येतोय...; दशकाची प्रतीक्षा अखेर संपली, NSE च्या ३० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी