महाराष्ट्र

ठाणे, नाशिक, पालघर, रायगडच्या महामार्गांवर खड्डेच खड्डे! मुख्यमंत्री संतप्त; दिले महत्त्वाचे आदेश

Swapnil S

मुंबई : ठाणे-नाशिक, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्यामुळे भर पडलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले आहेत. खड्डे बुजवण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा, खड्डे बुजविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करा, खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हा दाखल करा, असे कठोर आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

दरम्यान, खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक हार्डनर, एम सिक्टी तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडी, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच शुक्रवारी महामार्गावरील कामाची झाडाझडती मुख्यमंत्री घेणार आहेत.

सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूककोंडी, आगामी गणेशोत्सव कालावधीतील वाहतुकीचे नियोजन याबाबत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली.

नाशिक-भिवंडी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देतानाच रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय करू नका. गर्दीच्या वेळी अवजड वाहतुकीच्या नियमनासाठी कोकण विभागीय आयुक्तांनी एकत्रित अधिसूचना काढावी, अवजड वाहनांसाठी महामार्गालगत पार्कींग लॉट करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण विभागीय आयुक्त पी. वेलारासु, जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ, ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडखे, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम, परिवहन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे, नाशिक, रायगड जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, वाहतुक पोलिस अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

जेएनपीटीतून अवजड वाहनांचे नियंत्रण! 

एकीकडे खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू असताना वाहतुक नियमनासाठी २९० ट्रॅफीक वॉर्डन उपलब्ध करावेत. जेएनपीटीकडून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडू नये यासाठी या अवजड वाहतुकीचे नियमन करण्यासाठी जेएनपीटीमधून अवजड वाहनांचे नियंत्रण करण्यात यावे. त्याच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी ठाणे नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.  अवजड वाहनांच्या पार्कींगसाठी नाशिक महामार्गावर सोनाळे, पडघा, आसनगाव याठिकाणी पार्कींग लॉट तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा यावेळेत अवजड वाहतुक बंद करण्याबाबत एकत्रित अधिसूचना कोकण विभागीय आयुक्तांनी काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. खड्डे भरणे, नाल्यांची दुरुस्ती करणे आदीसह आवश्यक दुरुस्त्या करण्यात याव्यात, या कामाच्या प्रगतीचा दररोज आढावा घेण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा