महाराष्ट्र

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; प्रकृती चिंताजनक: गोळी मारणाऱ्याने स्वतःलाही संपवले

Rakesh Mali

उल्हासनगर येथील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण शांत होत नाही तोवर राज्यातील आणखी एक गोळीबार प्रकरण समोर आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहीसर येथे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.

गोळी मारणाऱ्याने स्वतःलाही संपवले-

पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केला आणि त्याने स्वतःला पण डोक्यात गोळी घालून संपवल्याची माहिती आहे. घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांना दहीसरमधील करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शिवसेना ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच झाडल्या गोळ्या-

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद होते, वाद मिटल्याने ते एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर यांना बोलावून फेसबुक लाईव्ह केले. याच वेळी गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे.

गोळी मारणाऱ्या व्यक्तीच्या कार्यालयाची तोडफोड-

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गोळ्या घालणाऱ्या मॉरिस नावाच्या व्यक्तीच्या कार्यालयाची तोडफोड केली. घडलेल्या प्रकारामुळे दहिसर परिसरातील वातावरण तापले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांचे विविध पथके तपासासाठी तैनात झाले आहेत.

महाराष्ट्र बदनाम होतोय-

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. "अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता त्यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी आली. काय चाललंय या राज्यात? गुंडांचे सरकार बसलंय. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावं लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहेत, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय", असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल