काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. आज (दि.१२) सकाळी ६.३० च्या सुमारास लातूरमधील राहत्या घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (दि.१३) बोरवटी गावातील त्यांच्या शेतात ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. 'देवघर' या निवासस्थानीच त्यांच्यावर फॅमिली डॉक्टरकडून उपचार सुरू होते. कॉग्रेसच्या राजकीय पटावरील अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी त्यांची ओळख होती. लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकर यांचे विशेष राजकीय वलय होते.
कोण होते शिवराज पाटील चाकूरकर?
१२ ऑक्टोबर १९३५ रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेल्या चाकूरकर यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर लातूर नगरपालिकेच्या राजकारणातून त्यांनी राजकारणाला सुरूवात केली. १ ऑगस्ट १९६६ ते ३१ मार्च १९७० पर्यंत ते येथे नगराध्यक्ष होते. त्यानंतर आमदार, विधानसभा उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा खासदार, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री ,लोकसभा उपसभापती, लोकसभा सभापती, केंद्रीय गृहमंत्री, राज्यसभा खासदार आणि पंजाबचे राज्यपाल अशा आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.
२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर देशातील गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. यावरून त्यांचे काँग्रेसमध्ये किती महत्त्व होते हे अधोरेखीत होते. पण, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून ३० नोव्हेंबर २००८ रोजी देशाच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी वारंवार पोशाख बदलण्यावरून ते प्रचंड चर्चेत आले होते आणि प्रखर टीका त्यांच्यावर झाली होती.
कुटुंबावर शोककळा
१९६३ मध्ये विजया पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. शिवराज पाटील यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या सूनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात सक्रीय आहेत. शिवराज पाटील यांच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.