महाराष्ट्र

काँग्रेसची विजयादशमी! 'गोकुळ' निवडणुकीत सतेज पाटलांनी दिला 'महायुती'ला धक्का

राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा किल्ला अर्थात गोकुळ दूध संघाचा अवघड गड अखेर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सर केला आहे. सत्ताधारी युती आणि विरोधी आघाडीची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या महासंग्रामात सोमवारी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी तब्बल १३ जागांवर विजयाचे सोने लुटले आणि विजयादशमी साजरी केली.

Swapnil S

कोल्हापूर : राज्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा किल्ला अर्थात गोकुळ दूध संघाचा अवघड गड अखेर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सर केला आहे. सत्ताधारी युती आणि विरोधी आघाडीची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या महासंग्रामात सोमवारी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी तब्बल १३ जागांवर विजयाचे सोने लुटले आणि विजयादशमी साजरी केली. विशेष म्हणजे मतपत्रिकांद्वारे घेण्यात आलेल्या या अटीतटीच्या लढ्यात सत्ताधारी महायुती प्रणित सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीला मोठा फटका बसला असून अवघ्या १२ जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले आहे.

कोल्हापुरातील प्रतिष्ठेची लढाई मानली जाणारी म्हणजे गोकुळ दूध उत्पादक संघाच्या या निवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीचे मतदान पार पडले असून मतमोजणीही पूर्ण झाली आहे. यात सतेज पाटील यांचे पॅनल मोठा विजय मिळविल्याने विरोधकांना बळ मिळाले आहे. तसेच ‘इव्हीएम’ हटवून मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीला आता बळ मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

शौमिका महाडिक अवघ्या ७ मतांनी पराभूत

महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवार शौमिका अमल महाडिक यांना काँग्रेसप्रणीत सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार राजू जयवंतराव आवळे यांच्याकडून अवघ्या ७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या निसटत्या पराभवामुळे महाडिक कुटुंबासह भाजप आणि महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. गोकुळच्या निवडणुकीत मतदाराने एकनिष्ठ राहावे यासाठी ‘ल्लमा रेणुका, ळूमामा हालसिद्धनाथ अशा देवतांच्या शपथा घालण्यात आल्या होत्या. भंडाऱ्याची राख, देवाच्या शपथा आणि जाडजुड पाकिटांसह सहलींना नेण्याच्या मोहाला न भुलता मतदारांनी स्वाभिमानाचा दणका दिल्याचे दिसून आहे.

सतेज पाटलांच्या पॅनलचे १३ उमेदवार विजयी

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार निवडणुकीत उतरले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ हजार ४१८ पात्र मतदारांपैकी ५ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीतसतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी तब्बल १३ जागांवर विजय मिळवला. तर महायुती प्रणित सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीला अवघ्या १२ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

‘अजिंक्यतारा’त दिवाळी

निकाल घोषित होताच विरोधी नेत्यांचे चेहरे पडले, तर दुसरीकडे सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा या जनसंपर्क कार्यालयावर जणू दसऱ्यापूर्वीच दिवाळी साजरी झाली. हजारो शेतकरी, दूध उत्पादक आणि तरुण कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात सतेज पाटलांना खांद्यावर घेतले. गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

महाडिक घराण्याचे वर्चस्व काढले मोडीत

गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळ दूध संघावर असलेले महाडिक घराण्याचे वर्चस्व या निवडणुकीत मोडीत काढत, सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीची सत्ता स्थापन करून महायुतीला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत पारंपरिक राजकीय घराण्यांतील अनेक दिग्गज नेते मैदानात असले, तरी मतदारांनी महायुतीच्या दोन प्रमुख नेत्यांना चांगलाच दणका दिला. सर्वात मोठा धक्का म्हणजे गोकुळचे विद्यमान साम्राज्य चालवणारे महायुतीचे शिलेदार मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव, मावळते अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना ओबीसी गटातून समविचारीचे शशिकांत खोत यांनी ६९ मतांनी पाडले, तर त्यांच्यासह गोकुळचे अरुण डोंगळे, विश्वास पाटील या माजी अध्यक्षांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. गेल्यावेळी विरोधी गटाची जबाबदारी एकहाती पेलणाऱ्या शौमिका महाडिक यांचा अवघ्या ७ मतांनी झालेला नाट्यमय पराभव हा या निवडणुकीचा महत्त्वाचा घटक ठरला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शिवसेनेचे आज दसरा मेळावे; दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

टायगर श्रॉफ हल्ला : तीन आरोपी अटकेत; हल्ल्यामागे खंडणीची शक्यता

राहुल गांधी यातून काही शहाणपण शिकतील?

रा. स्व. संघाचा वैश्विक संवादविस्तार

Dussehra 2026 : दसऱ्याला शस्त्रपूजनासाठी अवघ्या ४७ मिनिटांचा शुभ मुहूर्त! विजयादशमीची तिथी, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या