देवेंद्र फडणवीस यांचे संग्रहित छायाचित्र FPJ
महाराष्ट्र

सिंचन घोटाळा चौकशी फाईल गोपनीयतेचा भंग नाही; देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्धच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशी आदेशाची फाईल माहितीच्या अधिकारात कोणालाही उपलब्ध होऊ शकते, आपण ही फाईल अजित पवार यांना दाखविल्याने गोपनीयतेचा भंग होत नाही

Swapnil S

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्धच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांच्या चौकशी आदेशाची फाईल माहितीच्या अधिकारात कोणालाही उपलब्ध होऊ शकते, आपण ही फाईल अजित पवार यांना दाखविल्याने गोपनीयतेचा भंग होत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

फडणवीस यांनी आपल्याला फाईल दाखविल्याचे अजित पवार यांनी सांगितल्यानंतर यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला होता. ही फाईल माहितीच्या अधिकारामध्ये कोणालाही उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे अजित पवार यांना फाईल दाखविल्याने गोपनीयतेचा भंग होऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पक्षाचा निवडणुकीतील वचननामा प्रसिद्ध करणार आहेत, असे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये राहुल गांधी यांचे हमीपत्र चालले नाही, त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे. काँग्रेसने आश्वासन दिल्याप्रमाणे तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये हमीपत्राची अंमलबजावणी का केली नाही याचे स्पष्टीकरणही राहुल गांधी यांनी द्यावे, असेही ते म्हणाले.

राहुल यांचे हमीपत्र चालणार नाही!

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने हमीपत्र जारी करण्याची योजना आखली आहे, त्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी खिल्ली उडविली. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची ही खेळी चालली नाही, तशीच गत महाराष्ट्रामध्येही होणार आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

बंडखोरांबाबत रणनीती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण स्वतः शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन पक्षातील बंडखोरीची समस्या हाताळण्याबाबत रणनीती ठरविणार आहोत. आम्ही जवळपास सर्वच प्रश्न सोडविले आहेत आणि ४ नोव्हेंबरपर्यंत बहुसंख्य बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याचे तुम्हाला पाहावयास मिळेल. महायुतीच्या उमेदवारांनी सादर केलेले उमेदवारी अर्ज छाननीतून पार झाले आहेत आणि ५ नोव्हेंबरपासून पूर्ण धडाक्यात आमची प्रचाराला सुरुवात होणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मलिक यांचा मंत्रिमंडळात समावेशाचा प्रश्नच उद्भवत नाही

माजी खासदार गोपाळ शेट्टी हे बोरिवली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत, त्याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, शेट्टी हे पक्षाचे एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आम्ही त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करीत आहोत. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मंत्रिमंडळात स्थान देणार का, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, आमचा पक्ष मलिक यांचा प्रचारच करणार नाही. असे असताना त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी