Sangli : जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत विट्यात 'ट्री आर्मी'चा शुभारंभ; आमदार बाबर यांच्या उपक्रमाचे केले तोंडभरून कौतुक 
महाराष्ट्र

Sangli : जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत विट्यात 'ट्री आर्मी'चा शुभारंभ; आमदार बाबर यांच्या उपक्रमाचे केले तोंडभरून कौतुक

ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला भक्कम पाठिंबा जॅकी श्रॉफ यांनी दिला. यावेळी गार्डी-घानवडच्या माळावर साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. बाजरीची भाकरी, तूप, गूळ आणि मीठ असा साधा नाष्टा जॅकी श्रॉफ यांनी यावेळी केला.

Krantee V. Kale

"खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढविण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे," अशा हृदयस्पर्शी शब्दांत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचे कौतुक करत ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला भक्कम पाठिंबा दिला. गार्डी-घानवडच्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फाउंडेशनच्या माध्यमातून साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या लोकचळवळीचा औपचारिक शुभारंभ झाला.

कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ यांनी आमदार बाबर यांच्या साधेपणा, कार्यतत्परता आणि पर्यावरणावरील प्रेमाचे विशेष कौतुक केले. “फक्त बोलणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे यांच्यात फरक असतो. सुहास बाबर हे बोलण्याइतकेच कृतीतही प्रामाणिक आहेत,” असे सांगत त्यांनी वृक्षलागवडीच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. पृथ्वी ही आपली आई असून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, असा संदेशही त्यांनी दिला.

आमदार सुहास बाबर यांनी ट्री आर्मी ही कोणत्याही पक्षाची नव्हे तर समाजाची चळवळ असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प केला असून पुढील दोन वर्षांत ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जॅकी श्रॉफ यांच्या सहभागामुळे या मोहिमेला राष्ट्रीय ओळख मिळणार असून विट्यातून सुरू झालेली ट्री आर्मी आता देशभर आणि जगभर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अन् माझा भ्रम फुटला - आमदार सुहास बाबर

आमदार बाबर म्हणाले, मला मी खूप जमिनीवर राहुन काम करतो असे वाटायचे परंतु जॅकी दादांच्याकडे पाहिल्यावर माझा हा भ्रम फुटला आहे. एक सेलिब्रिटी असून देखिल किती विनम्र आणि किती साधे असावे हे पाहून अवाक् झालो आहे. दरम्यान, यावेळी जॅकी श्रॉफ यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाजरीची भाकरी, तूप, गूळ आणि मीठ असा साधा नाष्टा त्यांनी केला. एवढा साधा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नसल्याचे गौरवोद्गार आमदार बाबर यांनी काढले

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन