जळगाव : बोदव शहरात खाजगी शिकवणी घेणारा क्लास घेणा-या एका चालकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संशयाने संतप्त जमावाने क्लास चालकाचे गाव गाठत तेथे वाहनांची जाळपोळ व तोडफोड करत दगडफेक केली.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून येताच जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर व लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला. मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बोदवड तालुक्यातील जामठी येथील रहिवासी असलेल्या एका संशयिताचे बोदवडला खाजगी क्लासेस आहेत.
क्लासेसमध्ये पाचवी ते बारावी पर्यंतच्या विदयार्थ्यांना शिकवले जाते. बुधवारी सायंकाळी या क्लास चालकाने एका अल्पवयीन मुली सोबत अयोग्य वर्तन केले. तिला बळजबरीने कारमध्ये बसण्यास भाग पाडले.
काही तरूणांनी या दोघांना कारमध्ये पाहिले व मुलीवर कारमध्ये अत्याचार झााल्याच्या संशयाने जमाव संतप्त झाला. त्यांनी क्लासची व कारची तोडफोड केली. नंतर क्लास चालकाचे मुळ गाव जामठी गाठत तेथे जाळपोळ व दगडफेक सुरू केली. यात वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी अश्रूधूराच्या नळकांडया फोडल्या तसेच सौम्य लाठाचार्ज केला.