मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 
महाराष्ट्र

जव्हार : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक; प्रत्येकी ५०० रुपये उकळल्याचा आरोप

जव्हार तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवत काही दलालांकडून महिलांकडून प्रत्येकी ५०० रुपये उकळले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रतिनिधी

दीपक भिसे /जव्हार

जव्हार तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंद झालेला लाभ पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवत काही दलालांकडून महिलांकडून प्रत्येकी ५०० रुपये उकळले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर जव्हार पंचायत समितीच्या महिला व बालविकास विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

जव्हार तालुक्यात शिक्षण व रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे अनेक कुटुंबे विविध शासकीय योजनांवर अवलंबून आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे शहर व ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक आधार मिळाला. मात्र, निर्धारित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या काही लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात आले. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी महिलांची दिशाभूल करण्यास सुरुवात केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, लाभार्थ्यांना ५०० रुपये भरून ऑनलाइन तक्रार दाखल केल्यास बंद झालेला लाभ पुन्हा सुरू होईल अशी चुकीची माहिती दिली जात आहे. काही अनधिकृत व्यक्ती मंत्रालयस्तरावर तक्रार पाठवून लाभ पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन देत महिलांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांचे लाभ बंद करण्यात आले आहेत.

महिला व बालविकास विभागाने नागरिकांना कोणत्याही अफवा, सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश किंवा अनधिकृत व्यक्तींच्या आश्वासनांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. शासनाकडून योजनेबाबत कोणतेही नवीन निर्देश अथवा निर्णय झाल्यास त्याची माहिती अधिकृत माध्यमांतून जाहीर करण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

माझ्याकडे मोबाईल नव्हता. कागदपत्रांची पूर्तता करतानाही अनेक अडचणी आल्या. एका दलालाने ऑनलाइन तक्रार केल्यास लाभ पुन्हा सुरू होईल, असे सांगून माझ्यासह अनेक महिलांकडून प्रत्येकी ५०० रुपये घेतले. मात्र, अद्याप कोणताही हप्ता मिळालेला नाही.
प्रमिला महाले, लाभार्थी

३२० मीटर लांब सायकल ट्रॅक, पादचारी, पर्यटकांसाठी रस्ता ; कोस्टल रोड प्रकल्पात नव्याने समावेश; स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता

उरणवर पाणीसंकटाचे सावट; रानसई धरण आटले, मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू

Mumbai : गरीबनगरच्या जागेवर आता स्वतंत्र रिक्षा मार्गिका; पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत थेट उन्नत मार्ग, BMC चा प्रस्ताव आयुक्तांना सादर 

Mumbai : धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसूती; मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बाळ-माता सुरक्षित

भारत-पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यात ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य