कराड : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू; नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, चौकशीची मागणी प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

कराड : बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू; नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन, चौकशीची मागणी

कराड येथील शासकीय कै. माधवराव जाधव मुलांच्या बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला.

Swapnil S

कराड : कराड येथील शासकीय कै. माधवराव जाधव मुलांच्या बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. निशांत नितीन शिलेवंत असे मृत मुलाचे नाव आहे. सुधारगृहातील मुलांमध्ये झालेल्या मारहाणीत निशांत गंभीर जखमी झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून, संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, २७ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास निशांतला मारहाण झाली होती. त्यानंतर त्याला कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

मृत्यूची माहिती मिळताच संतप्त नातेवाईकांनी बालसुधारगृहासमोर ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

निशांतचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि बाल सुधारगृहातील व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी दिवसभर ठिय्या आंदोलन सुरू ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : रुग्णवाहिका आरटीओच्या रडारवर; आठ महिन्यांत ८२ रुग्णवाहिकांवर कारवाई

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक संशयित अटकेत

मुंबईतील धोकादायक चार पादचारी पूल बंद; मस्जिद, माटुंगा स्थानकांवरील वाहतूक रोखणार

आठव्या आशियाई विजेतेपदाचे लक्ष्य! महिलांच्या टी-२० आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आज भारत आणि श्रीलंका भिडणार

Mumbai Modak Mahotsav 2026 : बाप्पाचा आवडता खाऊ मुंबईकरांना घरपोच; उकडीच्या व तळलेल्या मोदकांचा घेता येणार आस्वाद