कशेडी घाटाच्या बोगद्यात गळती सुरूच; उपाययोजना कागदावरच, गणेशभक्तांवर चिंतेचे सावट (संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
महाराष्ट्र

कशेडी घाटाच्या बोगद्यात गळती सुरूच; उपाययोजना कागदावरच, गणेशभक्तांवर चिंतेचे सावट

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला भुयारी मार्गामध्ये वाहनांवर पाण्याची गळती अद्याप सुरू आहे. ही गळती रोखण्यासाठी आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार उपायोजना करण्याचे आश्वासन कागदावरच राहिले आहे.

Swapnil S

शैलेश पालकर/पोलादपूर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला भुयारी मार्गामध्ये वाहनांवर पाण्याची गळती अद्याप सुरू आहे. ही गळती रोखण्यासाठी आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार उपायोजना करण्याचे आश्वासन कागदावरच राहिले आहे.

कशेडी घाटातील ६ मार्गिका असलेल्या दुहेरी भुयारी मार्ग आणि जोडरस्त्यांच्या एकूण बांधकामासाठी सुमारे ५०२ कोटी खर्च झाला होता. रिलायन्स इन्फ्रा प्रोजेक्टने हे काम घेतले. त्याचे उपकंत्राट शिंदे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेड (एसडीपीएल) ला दिले. या भुयारी मार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण झाले. या भुयाराच्या छताकडील कातळातून पाणी गळती सुरू झाली.

आयआयटी मुंबईच्या सल्ल्यानुसार अंतर्गत भागातील खडकाचा दाब आणि पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी शॉटक्रिटसह पीव्हीसी मेम्ब्रेन आणि फायबर शीटचे अस्तर बसवण्यात आले. यामुळे भुयारी मार्गातील तीन पदरी रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या गटारांमध्ये छताच्या खडकातील गळणारे पाणी वळविण्यात आले आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना दोन्ही भुयारांमधील गळतीमुळे वाहने घसरण्याच्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे.

गळती दुरुस्तीचा खर्च किंवा गळती रोखण्याचे हे काम प्रकल्पाच्या 'दोष दायित्व' कालावधी अंतर्गत असल्यामुळे कंत्राटदार कंपनीवरच या मोफत दुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी आहे. परिणामी, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या दुरुस्तीसाठी स्वतंत्र किंवा वेगळा अतिरिक्त खर्च घोषित केलेला नाही. त्यामुळे गळती बंद करण्याचा खर्च मूळ कंत्राट आणि मेंटेनन्स कराराचाच भाग ठरला आहे.

प्रमाण कमी झाल्याचा ठेकेदाराचा दावा

याबाबत 'एसडीपीएल'चे अमोल शिवतारे यांनी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी गळतीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करीत लवकरच दोन्ही भुयारी मार्ग गळती मुक्त करण्याची ग्वाही दिली. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी आणि अमोल माडकर यांनी 'एसडीपीएल'चे अमोल शिवतारे यांनी दिलेल्या माहितीला दुजोरा दिला.

ढिसाळ मलमपट्टी

ही गळती रोखण्यासाठी आयआयटी मुंबईचा सल्ला घेण्यात आला. त्यानंतर पोट ठेकेदारांकडून मलमपट्टी करण्यास सुरुवात झाली. यामुळे भुयाराच्या आतील रस्ता निसरडा झाल्याने अपघाताचा धोका वाढला. पाण्याचा निचरा योग्यरीतीने झाला नाही व गळती रोखण्यासाठी केलेले कोटिंगचे काम टिकू शकले नाही. ड्रेनेज आणि पन्हाळी भुयारी मार्गाच्या छतातून गळणारे पाणी थेट रस्त्यावर किंवा वाहनांवर पडू नये म्हणून विशिष्ट पन्हाळी लावून ते पाणी मुख्य ड्रेनेज लाइनद्वारे भुयाराबाहेर काढण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Floods : मुंबईतील आठ पर्यटकांचा ठावठिकाणा लागेना; महाराष्ट्रातील ४०४ जण सुरक्षित

Mumbai : भांडुप स्टेशन परिसरातील बेकायदा स्टॉल जमीनदोस्त; मुंबईत १९७ किमी पदपथावरील अतिक्रमणे हटवली

Mumbai : स्वतःला परमेश्वर समजता का? FDA ला न्यायालयाचा सवाल; MCA तील रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू होणार

मराठवाड्यातील शाळांची दुरवस्था! केवळ इमारती 'हजर'; वीज, बाके, स्वच्छतागृहे 'गैरहजर'; 'स्कूल ठीक करो'तून समोर आले वास्तव

आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण मागे