सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे महामंडळाच्या विकास आराखड्यात गोवा आणि कर्नाटकला झुकते माप देण्यात आले असून, महाराष्ट्रासह कोकणातील प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना, या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात न आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
‘पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या १०४व्या बैठकीत कोकण रेल्वेच्या तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजला नुकतीच मंजुरी देण्यात आली. या पॅकेजमध्ये गोव्यातील पेडणे आणि जुने गोवे (ओल्ड गोवा) येथील बोगद्यांना समांतर नवीन जुळे बोगदे बांधण्यासाठी १,५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच गोवा आणि कर्नाटकातील काही ठिकाणी नवीन क्रॉसिंग स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र, सावंतवाडी टर्मिनस आणि कोकणातील दुहेरीकरणाचा समावेश नसल्याने कोकणावर अन्याय झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रलंबित आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २७ जून २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टर्मिनसचे भूमिपूजन केले होते. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतरही निधीअभावी हा प्रकल्प रखडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही प्रलंबित असल्याचा दावा संघटनेने केला आहे. महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळात गुंतवलेले ३९६.५४ कोटी रुपयांचे भागभांडवल परत करण्याची आणि ‘कोकण रेल्वे’ हे नाव कायम ठेवण्याची अट घातल्याने हा प्रश्न रखडल्याचे संघटनेने म्हटले आहे. यामुळे रोहा ते ठोकूर या सुमारे ७३९ किलोमीटर मार्गावरील दुहेरीकरणालाही विलंब होत असल्याचा आरोप आहे.
स्वतंत्र भांडवली निधीची मागणी
तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजमध्ये सावंतवाडी टर्मिनसचा तातडीने समावेश करावा, त्यासाठी स्वतंत्र भांडवली निधीची तरतूद करावी आणि वैभववाडी ते माजोरडा दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशा मागण्या संघटनेने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे बोर्डाकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सागर तळवडेकर आणि मिहीर मठकर यांनी दिला आहे.
कोकणातील प्रवाशांच्या महत्त्वाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याहून कोकणात धावणाऱ्या अनेक गाड्यांना टर्मिनसची सुविधा नसल्याने त्या मडगावपर्यंत न्याव्या लागतात.सागर तळवडेकर, उपाध्यक्ष,कोकण रेल्वे प्रवासी संघटना
सावंतवाडी येथे दोन अतिरिक्त हाय लेव्हल आयलँड प्लॅटफॉर्म, लूप लाइन्स, स्टेबलिंग ट्रॅक, क्विक वॉटरिंग सिस्टीम आणि वॉशिंग पिट लाइन उभारल्यास अनेक गाड्या सावंतवाडीतच समाप्त करता येतील. त्यामुळे मडगाव यार्डवरील ताण कमी होऊन गणेशोत्सव, दिवाळी, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विशेष गाड्यांचे नियोजन करणे सुलभ होईल.मिहीर मठकर, सचिव, कोकण रेल्वे प्रवासी संघटना