कुंभमेळाप्रकरणी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार; घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये खाटांमध्ये वाढ 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

कुंभमेळाप्रकरणी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार; घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष; नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये खाटांमध्ये वाढ

सिंहस्थ कुंभमेळा २०२७दरम्यान भाविकांना तातडीची आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने व्यापक आरोग्य आराखडा तयार केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे रुग्णालयांची क्षमता वाढविणे, घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष उभारणे, विविध भागांत ओपीडी सेवा उपलब्ध करणे तसेच 'रिले सिस्टीम' आधारित रुग्णवाहिका व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

Swapnil S

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७दरम्यान भाविकांना तातडीची आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने व्यापक आरोग्य आराखडा तयार केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे रुग्णालयांची क्षमता वाढविणे, घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष उभारणे, विविध भागांत ओपीडी सेवा उपलब्ध करणे तसेच 'रिले सिस्टीम' आधारित रुग्णवाहिका व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

नाशिक शहरातील एकूण खाट क्षमता १ हजार ३०५ वरून १ हजार ९४५ पर्यंत वाढविण्यात येणार असून त्यात १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल. तात्पुरत्या आरोग्य सुविधांद्वारे ६४० अतिरिक्त खाटा उभारल्या जाणार आहेत. तपोवन येथे १०० खाटांचे रुग्णालय तसेच नांदूर (साधुग्राम) येथे १० खाटांची सुविधा उभारण्यात येणार आहे.

शहरातील सर्व १३ घाटांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित केले जाणार असून २१ ठिकाणी ओपीडी सेवा आणि १९ ठिकाणी रुग्णालये व वैद्यकीय युनिट्स उभारली जाणार आहेत. पार्किंग क्षेत्रांचाही त्यात समावेश असेल. शहरातील विद्यमान ६२१ खासगी रुग्णालयांमधील १२ हजार ८०२ खाटा तसेच पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील १ हजार २७५ खाटा या 'रिझर्व्ह क्षमता' म्हणून वापरण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका व्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात येणार असून २५ नवीन आणि ७३ भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका 'रिले सिस्टीम'द्वारे कार्यरत राहतील.

त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या उपलब्ध असलेली ५० खाटांची क्षमता १२० पर्यंत वाढविण्यात येणार असून त्यात २७ आयसीयू खाटांचा समावेश असेल. तात्पुरत्या सुविधांद्वारे ७० अतिरिक्त खाटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय ४०० खाटांच्या क्षमतेची चार नवीन रुग्णालये प्रस्तावित आहेत.

घाट, पार्किंग, साधुग्राम अशा प्रत्येक ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध ठेवणे हे आमच्या नियोजनाचे केंद्रबिंदू आहे. प्रतिसादाचा वेग, व्यापक कव्हरेज आणि विश्वासार्ह सेवा यावर विशेष भर देण्यात आला आहे.
शेखर सिंह, आयुक्त कुंभमेळा प्राधिकरण
कुंभमेळ्यादरम्यान वाढणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तात्पुरत्या सुविधा आणि विकेंद्रित आरोग्य सेवा उभारल्या जात आहेत.
मनीषा खत्री, आयुक्त नाशिक महापालिका
मनुष्यबळ, उपकरणे आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचे समन्वयित नियोजन करण्यात येत असून गर्दीच्या दिवसांतही तातडीची वैद्यकीय मदत प्रभावीपणे उपलब्ध होईल.
डॉ. सतीश शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक

तीन खाटांची २५ तात्पुरती रुग्णालये

कुंभमेळ्यादरम्यान प्रमुख ठिकाणी तीन महिन्यांसाठी प्रत्येकी तीन खाटांची २५ तात्पुरती रुग्णालये सुरू केली जाणार आहेत. पर्वणी काळात तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. येथेही २५ नवीन आणि १६ भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका रिले मॉडेल 'वर कार्यरत राहतील. दोन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट, एएनएम आणि सहाय्यक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार असून भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही अखंडित आरोग्यसेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे.

...तर कंत्राटी कर्मचारी नियमित नियुक्तीचा हकदार बनत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

प्रभाग समित्यांवर बिगर सरकारी प्रतिनिधी; १४ वर्षांनंतर संघटनेचे प्रतिनिधी प्रभाग समित्यांवर

Mumbai : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ब्लॉक

मीरा-भाईंदरमधील २५४ एकर जमीन सरकारीच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, जमीन बिल्डरला देण्याच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार

Pune : शरद पवार गटाच्या विकास लवांडेंवर शाईफेक