कराड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर आणि पांचगणी इतकाच धार्मिक महत्त्व लाभलेला श्रीक्षेत्र महाबळेश्वर परिसर सध्या अव्यवस्थेच्या समस्यांनी ग्रासलेला दिसत आहे. 'महाराष्ट्राचे काश्मीर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात दररोज हजारो पर्यटक महाबळेश्वर मंदिर, कृष्णा, कोयना व पंचगंगा मंदिरांना भेट देतात; मात्र मूलभूत सुविधांचा अभाव आणि नियोजनातील त्रुटी यामुळे पर्यटकांचा अनुभव मात्र नाराजीचा ठरत आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त सलग सुट्टयांमुळे गेल्या काही दिवसांत येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. खासगी व सार्वजनिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूककोंडीची समस्या तीव्र झाली असून पर्यटकांना तासनतास रस्त्यावर अडकून राहावे लागत आहे. या कोंडीचा फटका स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनाही बसत आहे. सध्या महाबळेश्वर, पांचगणी व श्रीक्षेत्र महाबळेश्वर परिसरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अपुरी पार्किंग व्यवस्था आणि अनियोजित वाहतूक. सुट्टीचे दिवस आणि पर्यटन हंगामात परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात, तर उपलब्ध वाहनतळ अपुरे पडतात. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सार्वजनिक शौचालयांची कमतरता, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, कचऱ्याचे ढीग आणि अपुरी साफसफाई यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच मार्गदर्शन केंद्रांच्या अभावामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती मिळत नाही. वाहतूक नियंत्रणासाठीही सक्षम यंत्रणा नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे.
पर्यटन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, देशातील इतर पर्यटनस्थळे आधुनिक सुविधा, मोठे पार्किंग प्रकल्प, स्वच्छता मोहिमा आणि डिजिटल माहिती केंद्रांसाठी मोठी गुंतवणूक करत असताना, नैसर्गिक व धार्मिक वारसा लाभलेल्या या परिसराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. परिणामी, अनेक पर्यटक अव्यवस्था आणि सुविधांच्या अभावामुळे नाराजी व्यक्त करत परत जात असल्याचे चित्र दिसत आहे. याचा भविष्यातील पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटन घटल्यास स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार असल्याने स्थानिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सुसज्ज पार्किंग व्यवस्था, शिस्तबद्ध वाहतूक नियोजन, नियमित स्वच्छता मोहीम, सार्वजनिक सुविधा केंद्रे आणि पर्यटक मार्गदर्शन केंद्रे उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे केवळ पर्यटन स्थळ नसून महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या स्थळाची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रशासनाने घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे.
'त्यांनी' स्थानिक विकासासाठी पुढाकार घ्यावा
गेल्या काही वर्षांत महाबळेश्वर, पांचगणी आणि श्रीक्षेत्र महाबळेश्वर परिसरातील समस्या व विकासाचा मुद्दा समोर आला की, राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जाते. त्यांचे मूळ गाव दरे-तांब (ता. महाबळेश्वर) असल्याने स्थानिक विकासासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. स्वतःच्या जन्मभूमीत समस्या वाढत असतील, तर त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनाला आर्थिक व प्रशासकीय मदत देऊन या समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात, अशी मागणी नागरिक व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.