Photo : X
महाराष्ट्र

एक रविवार माधुरीसाठी! ‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी कोल्हापूरकर पुढे सरसावले असून रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी मूक पदयात्रा काढण्यात आली.

Swapnil S

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी कोल्हापूरकर पुढे सरसावले असून रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी मूक पदयात्रा काढण्यात आली. माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत शेकडो नागरीक सहभागी झाले होते.

‘एक रविवार माधुरीसाठी’ असे म्हणत मोठ्या संख्येने या मूक पदयात्रेत नागरिक सहभागी झाले होते. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी पहाटेपासूनच मूक पदयात्रेला नांदणीतून सुरुवात झाली. ही यात्रा सांगली-कोल्हापूर महामार्गाने शिरोली फाटा, पुणे-बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत निघाली. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देऊन महादेवी हत्तीण परत आणण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

गेल्या ३० वर्षांपासून नांदणी गावातील मठात असणाऱ्या या महादेवी हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे महादेवीला नांदणीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापूरवासियांनी केला आहे. त्यामुळेच रविवारी निघालेल्या या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारो नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’ असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या.

‘पेटा’च्या सुपारीमुळे महादेवी ‘वनतारा’कडे - राजू शेट्टी

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, “शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठातील महादेवी हत्तीणीला वनताराकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. ‘पेटा’च्या सुपारीमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देवस्थान आणि मठातील सर्व हत्ती वनताराला नेण्यात येणार आहेत. महादेवी हत्तीण नांदणी मठाच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात एक महत्त्वाचा घटक होती. तिच्या स्थलांतरामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून परिसरात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह कोल्हापुरातील अनेक नागरिक आग्रही आहेत.”

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल