महाराष्ट्र

‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात परतणार; कोल्हापूरकरांच्या एकीपुढे ‘वनतारा’ झुकले

‘महादेवी’ अर्थात ‘माधुरी’ हत्तीणीवरून सुरू असलेला गदारोळ अखेर शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, ‘महादेवी’ हत्तीणीला ज्या ‘वनतारा’मध्ये नेण्यात आले, त्या ‘वनतारा’च्या पथकाने दुसऱ्यांदा कोल्हापूरात येऊन लोकभावनांचा आदर करत अधिक सोयीसुविधा उभारून ‘महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Swapnil S

कोल्हापूर : ‘महादेवी’ अर्थात ‘माधुरी’ हत्तीणीवरून सुरू असलेला गदारोळ अखेर शमण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, ‘महादेवी’ हत्तीणीला ज्या ‘वनतारा’मध्ये नेण्यात आले, त्या ‘वनतारा’च्या पथकाने दुसऱ्यांदा कोल्हापूरात येऊन लोकभावनांचा आदर करत अधिक सोयीसुविधा उभारून ‘महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे ‘महादेवी’ हत्तीण पुन्हा नांदणी मठात परतणार, या आनंदासह कोल्हापूरकरांच्या एकीपुढे ‘वनतारा’ झुकले, अशी चर्चा सुरू आहे.

कोल्हापूरकरांची माफी मागितल्यानंतर ‘वनतारा’ची टीम बुधवारी पुन्हा कोल्हापुरात दाखल झाली. ‘वनतारा’चे पदाधिकारी, सीईओ यांनी कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग येथे नांदणी मठाचे मठाधिपती, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीला नांदणी मठाचे मठाधिपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर नांदणी मठाचे मठाधिपती आणि ‘वनतारा’चे सीईओ विवान कराणी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली

“नांदणीचा मठ, वनतारा आणि राज्य सरकार सर्वजण मिळून सुप्रीम कोर्टात पुनर्याचिका दाखल करणार आहोत. ही याचिका ‘पेटा’ आणि ‘एचपीसी’ यांच्या पाठिंब्याने दाखल करणार आहोत. आम्ही नांदणी मठात महाराणीसाठी चांगले घर बनवू, तिची चांगली व्यवस्था करू आणि इथे घेऊन येऊ, अशी बाजू कोर्टात मांडू. त्यामुळे त्याचा निकाल सकारात्मक येईल, अशी आम्हाला आशा आहे. अनंत अंबानी यांनी सांगितले आहे की, आम्हाला कधीच कोल्हापूरवासियांना दु:ख द्यायचे नव्हते. त्यांना ‘महादेवी’ची काळजी ‘वनतारा’मध्ये घ्यायची होती. पण कोल्हापूरकरांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर ‘महादेवी’ लवकरात लवकर कोल्हापुरात यावी, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये कोणाची हार किंवा विजय नाही. यामध्ये हत्तीचा विजयच आहे. ‘महादेवी’ला वनतारामध्येही चांगले घर मिळत होते आणि मठामध्येही चांगले घर मिळेल. तुमची ‘महादेवी’ लवकरच कोल्हापुरात येईल. तिच्यासाठी नांदणी मठामध्ये पुनर्वसन केंद्र उभारण्यास आम्ही मदत करणार आहोत,” अशी माहिती ‘वनतारा’चे सीईओ विवान कराणी यांनी दिली.

“हत्तीणीचा मालकीहक्क मठाकडे राहणार आहे. हत्तीची देखभाल, वैद्यकीय व्यवस्था ‘वनतारा’ पुरवणार आहे. त्याचबरोबर ‘वनतारा’च्या सीईओंशी समाधानकारक चर्चा झाली असून ‘महादेवी’ परत येईपर्यंत वनताराने आम्हाला मदत करावी, अशी आमची विनंती आहे. अनंत अंबानी यांच्या परिवाराने ‘वनतारा’च्या पथकाला येथे पाठवले आहे. अंबानी यांच्या या भूमिकेला आमचा आशीर्वाद आहे,” असे नांदणी मठाचे मठाधिपती महास्वामी यांनी सांगितले.

कोल्हापूरकरांच्या एकजुटीचा विजय - सतेज पाटील

‘महादेवी’ हत्तीणीला न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत आणण्याचा निर्णय हा कोल्हापुरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा विजय आहे.‘महादेवी’चे कोल्हापुरातच पुनर्वसन करण्याच्या ‘वनतारा’ व्यवस्थापनेच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

मुसळधारचा इशारा! राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

ध्वजारोहणास नाशिकऐवजी गोंदिया दिल्याने भुजबळ नाराज? प्रकृतीच्या कारणावरून जाण्यास दिला नकार

आम्हालाही "कोट्यवधी मोजा, गुलाल उधळा"चे आमिष; माजी आमदार संजय चव्हाण यांचा खळबळजनक आरोप

Mumbai : आगामी BMC निवडणुकीच्या कामास नकार; साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविकांचा पवित्रा

पाकिस्तानवर मेहरबान ट्रम्प! ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’, ‘माजीद ब्रिगेड’चा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश