साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
महाराष्ट्र

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठीच्या सुलभ कर्ज योजनेला मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठीच्या सुलभ कर्ज योजनेला मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. साखर कारखान्यांना थकीत एफआरपीची रक्कम देण्यासाठी तसेच आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी ७३८ कोटी ५१ लाख रुपयांच्या व्याज अनुदानासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयाचा लाभ राज्यातील १०२ सहकारी साखर कारखान्यांना होईल.

राज्यात २०२५-२६ मधील गाळप हंगामात १०२ सहकारी साखर कारखान्यांनी ५२७.५१ लाख मे.टन ऊस गाळप केले. मात्र साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि पुढील हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. त्यानुसार या योजनेस मान्यता देण्यात आली. यापूर्वी २०१५ आणि २०१९ मध्ये सुलभ योजना योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांमध्ये वित्तीय संस्थांनी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासाठी व्याज अनुदान देण्यात आले होते.

सुलभ कर्ज योजनेच्या अंतर्गत पुढील सात वर्षांसाठी सुमारे ७३८ कोटी ५१ लाखांचे व्याज अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत बँकांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मंजुर आणि वितरित केलेली रक्कम व्याज अनुदानाला पात्र राहील. योजनेत मंजूर झालेल्या कर्जाचा विनियोग प्रामुख्याने थकीत एफआरपीची रक्कम आदा करण्यास बंधनकारक असेल.

कर्जाचा हप्ता वेळेत न भरल्यास योजनेतून बाद

कर्जाचा हप्ता वेळेत न भरणाऱ्या साखर कारखान्यांना या योजनेतून तत्काळ वगळण्यात येईल. तसेच अशा कारखान्यांना पुढील कालावधीसाठी व्याज सवलत मिळणार नाही. यासाठी साखर कारखान्यांना जुलै २०२७ पर्यंत कर्जाबाबतचा विनियोग दाखला सादर करावा लागणार आहे. असा दाखला सादर करू न शकल्यास व्याज अनुदान मिळण्यास कारखाना अपात्र ठरेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : कुर्ल्यात अतिक्रमणांपासून मुक्ती; बेकायदा बांधकामे, स्टॉल जमीनदोस्त, एल विभागाची कारवाई

सीईटी परीक्षेचीही SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

संजुक्ता पराशर बनल्या ‘कोब्रा’ दलाच्या IG; कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

समान नागरी कायद्याला JDU ची सशर्त तयारी