मुंबई : अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
विशेष फेरी-१ अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांना संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.