राज्यातील ११६ दुय्यम कारागृहांना कायमचे टाळे; महसूल विभागाचा निर्णय 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

राज्यातील ११६ दुय्यम कारागृहांना कायमचे टाळे; महसूल विभागाचा निर्णय

राज्यातील सर्वच्या सर्व ११६ दुय्यम कारागृहांना कायमस्वरूपी टाळे लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील सर्वच्या सर्व ११६ दुय्यम कारागृहांना कायमस्वरूपी टाळे लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २० ते १०० कैद्यांची क्षमता असलेली या कारागृहांची दुरवस्था झाल्याने तसेच यातील ८० कारागृहे बंदच असल्याने ही कारागृहे दुरुस्त न करता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. महसूल विभागाने शुक्रवारी या संदर्भतील शासन निर्णय जारी केला.

राज्यभरातील दुय्यम कारागृहांची सद्यःस्थिती आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी गृह विभागाने १७ ऑक्टोबर २०२३ रोजी एका विशेष अभ्यासगटाची स्थापना केली. या अभ्यासगटाने १० डिसेंबर २०२४ रोजी आपला अंतिम अहवाल सरकारला सादर केला. या अहवालावर महसूल आणि गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर ही कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे ब्रिटिश काळापासून चालत आलेली आणि स्वातंत्र्यानंतर सात दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेली 'दुय्यम तुरुंग नियमपुस्तिका, १९५२' इतिहासजमा झाली आहे.

सध्या राज्यातील एकूण ११६ दुय्यम कारागृहांपैकी तब्बल ८० कारागृहे आधीच बंद अवस्थेत पडलेली आहेत तर उर्वरित ३६ कारागृहे तांत्रिकदृष्ट्या कार्यरत असली तरी ती सुस्थितीत नाहीत. या दुय्यम कारागृहांमध्ये सद्यस्थितीत दाखल असलेल्या कैद्यांना संबंधित जिल्ह्यातील जिल्हा कारागृह किंवा मध्यवर्ती कारागृहांमध्ये तातडीने रवानगी करण्याची जबाबदारी गृह (तुरुंग) विभागाकडे देण्यात आली आहे.

पदे वर्ग करणार

दुय्यम कारागृहांसाठी गृह विभागाची लिपिक संवर्गातील (वर्ग-३) एकूण ६ पदे मंजूर होती. ही पदे श्रीरामपूर (अहिल्यानगर), महाड (रायगड), मालेगाव (नाशिक), तळोदा (नंदुरबार), कराड (सातारा) आणि उदगीर (लातूर) या ठिकाणी मंजूर असून सद्यस्थितीत ती रिक्त आहेत. आता ही सर्व रिक्त पदे संबंधित कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत.

आर्थिक तरतूद बंद

दुय्यम कारागृहांचे दैनंदिन व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे वेतन, दूरध्वनी, वीज आणि पाणी शुल्क, कंत्राटी सेवा, आहार खर्च तसेच कार्यालयीन खर्चासाठी गृह विभागामार्फत विशेष अर्थसंकल्पीय तरतूद केली जात होती. आता ही कारागृहे बंद झाल्यामुळे पुढील आर्थिक वर्षांपासून निधीची तरतूद बंद केली जाणार आहे.

IPO चा जोर कायम; जिओ प्लॅटफॉर्म्ससह डझनभर कंपन्या प्राथमिक बाजारात उतरणार

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही; दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय, तीन नवी ठिकाणे निश्चित

WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

Mumbai : कोस्टल रोडवर उभारणार अत्याधुनिक बायो टॉयलेट; पालिका करणार ४ कोटी १९ लाख रुपये खर्च

Period Problems : महिन्यातून दोनदा पाळी येतेय? महिलांनो, दुर्लक्ष करू नका; डॉक्टर सांगतात...