महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १६ जागांसाठी निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.१८) केली. या सर्व जागांसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी नागपूर मतदारसंघातील पोटनिवडणूकही होणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित भागांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक
२५ मे २०२६ - अधिकृत अधिसूचना जारी
१ जून २०२६ - नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
२ जून २०२६ - अर्जांची छाननी
४ जून २०२६ - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
१८ जून २०२६ - मतदान (सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
२२ जून २०२६ - मतमोजणी आणि निकाल
'या' १६ मतदारसंघांमध्ये होणार मतदान
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, धाराशिव-जालना या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व यापूर्वी प्रशांत परिचारक, चंदुभाई पटेल, अंबादास दानवे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी केले होते.
नागपूरमध्येही पोटनिवडणुकीची घोषणा
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेसाठी निवडून गेल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ही जागा रिक्त होती. मात्र, आवश्यक निकष पूर्ण न झाल्यामुळे ही पोटनिवडणूकही रखडली होती. त्यानंतर आता नागपूरमध्येही १८ जूनलाच मतदान होणार आहे.
रखडलेल्या निवडणुकांना अखेर हिरवा कंदील
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १६ सदस्यांचा कार्यकाळ २०२२ ते २०२५ या कालावधीत संपला होता. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत, प्रशासकीय अडचणी आणि मतदार याद्यांशी संबंधित निकष पूर्ण न झाल्यामुळे निवडणुका वेळेत घेता आल्या नव्हत्या.
आयोगाच्या नियमांनुसार, एखाद्या मतदारसंघात किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असणे आवश्यक असते. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आता हे सर्व निकष पूर्ण झाल्याची माहिती आयोगाला दिल्यानंतर निवडणुकीची घोषणा करण्यात आली.